
सामना प्रतिनिधी । नाशिक
बृहन्मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या चारजणांच्या टोळीला अटक करण्यात सिन्नर पोलिसांना यश आले. न्यायालयाने यातील तीन संशयितांना न्यायालयीन कोठडी दिली, तर एका महिलेला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सिन्नर तालुक्यातील जामगाव येथे राहणाऱ्या विमल साबळे यांच्या मुलाला, तसेच नातेवाईकांना बृहन्मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो, असे सांगत मुंबईच्या ओशिवारा येथील राहुल बोडके (42) याने सन 2014 मध्ये 4 लाख 20 हजार रुपये घेतले. जामगाव येथील सावळीराम बोडके (55) या मध्यस्तामार्फत साबळे यांनी ते पैसे दिले. मात्र, नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साबळे यांनी डिसेंबर 2018 मध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात राहुल बोडकेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. तपासाअंती सिन्नर पोलिसांनी ४ मार्चला सावळीराम बोडके याला जामगाव येथून, 6 मार्चला राहुल बोडके (42) याला मुंबईतील ओशिवारा येथून, रवींद्र पवार (52) याला 8 मार्चला मुंबईतील कांदिवलीतून, तर राहुलची भावजयी शोभा बोडके (40) हिला सोमवारी सकाळी मुंबईतून अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सावळीराम, राहुल व रवींद्र यांना न्यायालयीन कोठडी दिली, तर शोभा बोडके हिला 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
या प्रकरणात आणखी काहीजणांची अशाचप्रकारे फसवणूक झाल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी दिली.
































































