हिंदुस्थानमध्ये पुन्हा फुटबॉल वर्ल्डकपची किक;2020 मध्ये रंगणार युवा महिलांची स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कुमार (17 वर्षांखालील) फुटबॉल वर्ल्ड कपचे यशस्वी आयोजन करणाऱ्या हिंदुस्थानला ‘फिफा’ने कुमारी फुटबॉल वर्ल्ड कपची यजमानी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे आता हिंदुस्थानात 2020मध्ये कुमारी फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ‘फिफा’कडून ही घोषणा करण्यात आली.

मियामीमध्ये झालेल्या ‘फिफा’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आधी हिंदुस्थानने कुमार फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे यशस्की आयोजन केले होते. या नेटक्या आयोजनामुळेच हिंदुस्थानला आगामी कुमारी फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ‘फिफा’कडून पसंती मिळाली. या स्पर्धेच्या निमित्ताने हिंदुस्थानचा संघ कुमारी फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करेल. हिंदुस्थानचा महिला संघ सध्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत खेळत असून त्यांनी बुधवारी सलामीच्या लढतीत मालदीवचा 6-0 गोलने धुव्वा उडविला. चार वेळा सॅफ चॅम्पियन ठरलेला हिंदुस्थानी महिला संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजेय आहे, हे विशेष.

11 वर्षांपूर्वी ‘फिफा’ने सुरू केली ही स्पर्धा

‘फिफा’ने 2008 मध्ये कुमारी (17 वर्षांखालील) फुटबॉल वर्ल्ड कपची सुरुवात केली. ही स्पर्धा दर दोन वर्षांनंतर होते. उत्तर कोरियाने या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले होते. गतवर्षी स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने ही स्पर्धा जिंकली. 2018 साली उरुग्केमध्ये झालेल्या कर्ल्ड कप स्पर्धेत स्पेनच्या संघाने मेक्सिकोच्या महिला संघाचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. त्यावेळी न्यूझीलंड आणि कॅनडाचा संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिला होता.

 भव्यदिव्य आयोजन करू!

‘फिफा’ने दुसऱ्यांदा हिंदुस्थानला ही संधी दिली आहे. या आधी अखिल हिंदुस्थान फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) 2017मध्ये कुमार फुटबॉल वर्ल्ड कपचेही हिंदुस्थानने यशस्वी आयोजन केले होते. या यशस्वी आयोजनामुळेच ‘फिफा’ने कुमारी फुटबॉल वर्ल्ड कपची यजमानी आम्हाला दिली आहे. या स्पर्धेचेही भव्यदिव्य आयोजन करू.

प्रफुल्ल पटेल (अध्यक्ष, एआयएफएफ)