पंतप्रधान मोदींनी दिल्या पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा, इम्रान खानचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास हिंदुस्थानने सुरुवात केली आहे. आज पाकिस्तान दिनाच्या सर्व कार्यक्रमांवर हिंदुस्थानने बहिष्कार टाकला होता. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र त्यांना हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्याचा दावा केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना मेसेज पाठवून पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘पाकिस्तानच्या जनतेला मी पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा देता. आता ही वेळ आली आहे की हिंदुस्थानी उपखंडातील लोकांनी दहशतवाद व हिंसाचार मुक्त वातावरणात लोकशाही, शांतता, विकास व भरभराटीसाठी एकत्र येऊन काम करावे’ असा मेसेज मोदींनी पाठवल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे.

दरम्यान आज हिंदुस्थानने पाकिस्तान दिनाच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घातला होता. दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तात झालेल्या कार्यक्रमात तसेच इस्लामाबाद मध्ये झालेल्या पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमात एकही हिंदुस्थानी अधिकारी सहभागी झाला नव्हता.