
सामना ऑनलाईन । दुबई
क्रिकेटचा प्रचार व प्रसार होण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसताहेत, मात्र पारंपरिक कसोटी यापासून दूरच राहिले. पण आता जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींसाठी आस्थेचा विषय असलेल्या कसोटी क्रिकेटमध्येही बदल होताना दिसणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्याकडून आयसीसीकडे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पांढऱ्या पोषाखावर नाव व क्रमांक देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. आयसीसीकडून या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला असल्यामुळे तब्बल 142 वर्षांनंतर कसोटीत मोठा बदल झालेला दिसेल.
ऍशेसने सुरुवात
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यामध्ये 1877 साली झालेल्या कसोटीत खेळाडूंच्या पोषाखावर नाव व क्रमांक देण्यात आले होते. पण त्यानंतर 142 वर्षांच्या कालावधीत कसोटीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यामध्ये या वर्षी होणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील लढतीदरम्यान क्रिकेटपटूंच्या पोषाखावर नाव व क्रमांक देण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
























































