
सामना ऑनलाईन । मुंबई
म्हशीच खुलं दूध घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चटका बसवणारी ही बातमी आहे. कारण थेट गोठ्यांमधून मिळणाऱ्या म्हशीच्या खुल्या दुधाचा दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादन मंडळाकडून घेण्यात आला आहे. मात्र असे असले तरी म्हशीचे पिशवी बंद दूध जसे की अमुल, गोकुळ, गोवर्धन आणि त्यासारखे अन्य ब्रँडच्या दुधाच्या किमतीत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
मुंबई दूध उत्पादन मंडळाअंतर्गत मुंबई आणि ठाणे परिसरातील 1700 दूध डेरी येतात. या मंडळाकडून म्हशीच्या खुल्या दुधात दर वाढ करण्यात येणार असून घाऊक बाजारात 64 रुपये प्रति लिटर ऐवजी आता 66 रुपये प्रति लिटर मोजावे लागतील. तर किरकोळ विक्री बाजारात सध्या 70 ते 75 रुपये प्रति लिटर दराने दूध विकले जाते. त्यामध्ये 2 रुपयांची वाढ होईल. 1 एप्रिल 2019 पासून ही वाढ लागू करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
म्हशींसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. तसेच डेरीतील कामगार आणि ट्रान्सपोर्टचा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळेच ही वाढ करणे गरजेचे असल्याचे मंडळाचे अध्यक्ष वालीभाई पिरजी यांनी सांगितले आहे.



























































