
सामना प्रतिनिधी । मुंबई
1 एप्रिलपासून राज्यातील तब्बल 2 कोटी 40 लाख वीज ग्राहकांना महागडय़ा विजेचे चटके बसणार आहे. वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनुसार महावितरणच्या विजेचे दर तीन टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या प्रतियुनिट विजेच्या दरात 20 ते 90 पैशांची वाढ होणार आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांचे आणि शेतकऱयांचे वीज बिलही फुगणार आहे.
घरगुती ग्राहक सध्याचा दर (रु.) नवा दर (रु.)
0-100 – 4.30 – 4.33
101-300 – 8.03 – 8.23
301-500 – 11.05 – 11.18
500-1000 – 11.80 – 12.78
वीज आयोगाने बहुवार्षिक दरवाढ देताना मंजूर केलेल्या 20 हजार 651 कोटींपैकी 8 हजार 265 कोटी रुपये वसूल करण्यास परवानगी देत सुमारे साडेबारा हजार कोटी रुपये नियामक मत्ता म्हणून ठेवले होते. सदर रक्कम एप्रिल 2020 नंतर व्याजासह वसूल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढील वर्षी वीज दरवाढीचे मोठे चटके सोसावे लागणार आहेत.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सफ्टेंबर 2018 मध्ये महावितरणला बहुवार्षिक वीज दरवाढ देताना 20 हजार 651 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र ग्राहकांना टेरिफ शॉक बसू नये म्हणून 2018-19 आणि 2019-20 या दोन वर्षांत केवळ 8 हजार 265 कोटी रुपये वसूल करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार सप्टेंबरमध्ये तीन टक्के वीज दरवाढ केली असून उर्वरित तीन टक्के वीज दरवाढ 1 एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे सात-आठ महिन्यांच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना दुसऱयांदा वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहे. तसेच घरगुती ग्राहकांचा स्थिर आकार 80 रुपयांवरून 90 रुपये होणार आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने मेटाकुटीस आलेल्या वीज ग्राहकांचा खिसा पुरता खाली होणार असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे.
सहा टक्के एफएसीची छुपी वाढ
राज्यातील वीज ग्राहक गेल्या सात महिन्यांपासून तीन टक्के वीज दरवाढीचे चटके सहन करत असतानाच महावितरणने छुप्या पद्धतीने सहा टक्के इंधन समायोजन आकार (एफएसी) ग्राहकांच्या वीज बिलात लावत तब्बल 2500 कोटी रुपयांची वसूली केली आहे. वीज दरवाढीनंतर एफएसी शून्य होणे आवश्यक होते, पण तसे न झाल्याने ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागला असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला आहे.































































