
- शेफ विष्णू मनोहर
कवी रामदास फुटाणे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. घरात वारी आणि गावात दुष्काळ असल्याने पुढय़ात येईल ते आणि साध्या अन्नातच समाधान मानणारे!
कविवर्य रामदास फुटाणे. माणूस म्हणून मैत्री करण्यासारखं हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व. मूळचे नगर जिल्हय़ातील जामखेड इथले. नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांना म्हटलं, ‘‘संध्याकाळचे जेवण आपण सोबत करू त्याबरोबर गप्पासुद्धा!’’ ते आनंदाने तयार झाले, गप्पांना सुरू करण्याआधी आम्ही सूप मागवलं आणि ते म्हणाले की, आता गप्पा पूर्ण होईपर्यंत सूपच प्यायचे, त्यांनीच संभाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, पूर्वी कवितांचे जाहीर कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात होत असे त्यामुळे वेगवेगळ्या शहरात, गावात जाण्याचा योग असल्याने तेथील खाद्य संस्कृतीची मला ओळख झाली.
तसा मी मुळात खवय्या नाही. माझं बालपण खेडय़ात गेले. तिथे फक्त मर्यादित पदार्थच खाण्यात येत. भाजी- भाकरी व आमटी. फक्त सणावाराला गोड पदार्थ. पुरणपोळी, दिवाळीत लाडू, करंज्या, अनारसे असे मोजकेच पदार्थ. सत्यनारायणाचा प्रसाद व भंडारा असेल तर गव्हाची लापशी. संपूर्ण तालुका दुष्काळी असल्यामुळे खाण्यापिण्याचे लाड कुणालाच परवडणारे नव्हते. शिवाय आमचे घर वारकरी संप्रदायाचे, शाकाहारी. जिभेचे लाड पुरवले जात नव्हते.
त्यांना जेव्हा विचारलं की, तुम्हाला काय बनविता येतं? तर ते हसून म्हणाले, मला कविता लिहिता येतात. स्वयंपाक कधी केलेला नाही, त्यातील काहीही कळत नाही, पण वेगवेगळ्या प्रांतातील खाद्य संस्कृतीची ओळख करून घ्यायला मला आवडतं. त्यातून मला माझं सांस्कृतिक खाद्य मिळतं. ते म्हणाले, विसाव्या वर्षी मी मुंबईत नोकरीसाठी गेलो व जगातील विविध पदार्थांचा जिभेला व खिशाला परिचय झाला. हळूहळू मांसाहार सुरू झाला. नंतर मालवणी फिश आवडू लागले.
पुण्यामधे तशी मोजकीच घरं आहेत की, त्यांच्याकडे मी जेवायला जातो. त्यातील एक घर म्हणजे डी. वाय. पाटीलसाहेबांचं. त्याच्याकडे साग्रसंगीत आणि उत्कृष्ट असं जेवण असतं.’’
त्यांना विचारलं की, ‘‘तुमच्या घरी मांसाहारी चालतं काय?’’ तर ते म्हणाले, ‘‘घरी तर नाही, पण बाहेर कधी कधी मांसाहार होतो. पत्नी सर्व भाज्या, आमटी चवदार करते. त्यांच्या मताप्रमाणे घरचं शाकाहारी जेवण उत्तम असते. कवी संमेलन संपले की, रात्री उशिराच जेवण असते. काही मांसाहारी, काही शाकाहारी. त्यांना विचारलं की, ‘‘तुमचे आवडते पदार्थ कोणते?’’ तर ते पटकन म्हणाले, ‘‘माझे आवडते पदार्थ व जागा ठरलेल्या आहेत. नागपूरात शाकाहारी ‘विष्णूजी की रसोई’मध्ये आणि मांसाहारी ‘जगदीश सावजी’. पुण्यातील सिंहगड रोडवरील सत्कार रेस्टॉरंटमधील मालवणी अतिशय प्रिय. प्रवासात सर्व जिह्यांत जेवणाच्या जागा निश्चित आहेत. खिशाला परवडेल असेच चवदार हॉटेल निवडतो. पोटावर व खिशावर अन्याय नको. त्यांना शेवटी प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही लिहीलेली तुमची आवडती कविता कोणती?’’ त्यांचे उत्तर होतं ‘‘कटपीस’’. ही कविता त्यांनी 1967 साली लिहिलेली होती. जाता-जाता त्यांनी ती ऐकवली.
कटाची आमटी

साहित्य – चणाडाळ 1 वाटी, सुकं खोबऱयाचां कीस 2 चमचे, जीरे 1 चमचा, काळी मिरी 1 चमचा, लवंग 3-4, तमालपत्र 2-3, दालचिनी अर्धा चमचा
फोडणीकरीता – मोहरी 1 चमचा, जीरे 1 चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा, तिखट पाव चमचा, कढीपत्ता 8-10 पाने, तेल 2 चमचे, चिंचेचा कोळ 2 चमचे, गूळ 2 चमचे, खवलेला नारळ 2 चमचे, कोथिंबीर 4 चमचे, मीठ चवीनुसार, गोडा मसाला 1 चमचा.
कृती – चणा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी. तोपर्यंत खोबऱयाचा किस, जीरे, लवंग, दालचिनी व तमालपत्र एकत्र भाजून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. चणाडाळ शिजल्यावर ती व्यवस्थित घोटून घ्यावी. एका भांडयात तेल गरम करुन मोहरी, जीरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. नंतर घोटवलेली चणाडाळ व आवश्यक तेवढे पाणी घालावे. उकळी आली की त्यात वाटलेली पेस्ट व गोडा मसाला घालावा. मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. नंतर चिंचेचा कोळ, गूळ, चवीनुसार मीठ घालून उकळी आणावी. मिश्रण घट्ट होत असल्यास थोडे पाणी घालावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ व कोथिंबीर घालून मंद आचेवर उकळवावे. गरमगरम भाताबरोबर खायला द्यावे. वरुन थोडे साजूक तूप घालावे.
भरलेला बांगडा

साहित्य – मध्यम आकाराचे बांगडे 6, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार, लसूण पाकळया 8-10, सुक्या मिरच्या 8-10, मालवणी मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर अर्धी वाटी, आमसुल 3-4, ओलं खोबरं 1 वाटी, तांदूळाचे पीठ अर्धी वाटी, तेल तळण्यासाठी.
कृती – बांगडे साफ करुन फक्त डोक्याचा भाग काढावा. दोन्ही बाजूनं प्रत्येकी 3-4 चिरा देऊन धुवावे. हळद-मीठ लावून ठेवावे. लसूण, कोथिंबीर, आमसुल, मिरच्या, खोबरं, मीठ मसाला एकत्र करुन जाडसर वाटावं. ती चटणी बांगडयाच्या चीरामध्ये पोटाच्या बाजूनं आत भरावी. थोडी चटणी वरुनही लावावी. नंतर ते बांगडे तांदळाच्या पिठात घोळवून, खोलगट तव्यावर कडेनं तेल सोडून तळावे.



























































