
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानने हिंदुस्थानजवळील आपले हवाई हद्दीवरील आपली बंदी 15 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या नागरी विमानन प्राधिकरणाने (सीएए) ही माहिती गुरुवारी दिली. हिंदुस्थानी वायुदलाने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळावर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने फेब्रुवारीमध्ये हिंदुस्थानजवळील आपले हवाई हद्द पूर्णपणे बंद केले होते.
नवी दिल्ली, बँकॉक आणि कुआलम्पूर सोडून बाकीच्या विमानांना आपल्या हद्दीतून जाण्यास पाकिस्तानने 27 मार्च रोजी परवानगी दिली होती. त्यानंतर 15 मे रोजी पाकिस्तानातून हिंदुस्थानात जाणाऱ्या विमानांवरील बंदी पाकिस्तानने 30 मेपर्यंत वाढवली होती. आता हीच बंदी पाकिस्तान प्रशासनाने 15 जून रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवली आहे. सीएएकडून जारी करण्यात आलेल्या एका वेगळ्या नोटिसीनुसार पंजगूर हवाई हद्द पाश्चिमात्य देशांमधून येणाऱ्या विमानांसाठी खुलेच ठेवण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना किर्गीस्तान येथील बिश्केक येथे झालेल्या एससीओ परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिली होती.
























































