2024 सालापर्यंत राममंदिर उभारले जाईल- रामविलास वेदांती यांचे सूचक वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अयोध्या

केंद्र सरकार 2024पर्यंत राममंदिर उभारेल, असे सूचक वक्तव्य रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी केले असून अयोध्येचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.

रामविलास वेदांती यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या चौथ्या टप्प्यात अयोध्येतील राममंदिर उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकार 2020 मध्ये राज्यसभेत बहुमत मिळाल्यानंतर सर्वात आधी कश्मीरमधून कलम 370 रद्द करेल. त्यानंतर दुसऱया टप्प्यात कलम 35 अ संपवेल आणि तिसऱया टप्प्यात रामजन्मभूमी न्यासाकडे परत वर्ग करेल. वेदांती यांनी दावा केलाय की, जमीन परत मिळाल्यानंतर चौथ्या टप्प्यात 2024 मध्ये केंद्र सरकार राममंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. सर्वोच्च न्यायालयात जमीन परत करण्यासंबंधीची याचिका दाखल करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे, अशी माहितीही वेदांती यांनी दिली.

हे कार्य फक्त मोदीच करू शकतात

सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिरसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आमच्या आशा कायम आहेत. हिंदुत्व भावनेचं रक्षण होईल आणि लवकरच राममंदिर उभारण्याचे काम सुरू होईल, असा संतमहंतांना विश्वास आहे. हे काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असे रामविलास वेदांती यांनी सांगितले.