मल्ल्या, मोदीनंतर आता मुस्लीम बँकर कोट्यवधींचा चुना लावून परदेशी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

बँकांना कोट्यवधींचा चुना लावून परदेशी फरार झालेल्या उद्योगपतींच्या यादीत आता अजून एका नावाची भर पडली आहे. आय मॉनिटरी अॅडवायझरी (IMA) या नावाने इस्लामिक बँक चालवणारा एक मुस्लीम बँकर लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देऊन परदेशी पळून गेला आहे. मोहम्मद मन्सूर खान असं या बँकरचं नाव आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमए ही बँक 2006मध्ये स्थापन करण्यात आली होती. खान हा या बँकेचा संस्थापक होता. त्याने भांडवल वाढवण्याच्या उद्देशाने 14 ते 18 टक्के व्याजदराने परताव्याचं आश्वासन ग्राहकांना दिलं होतं. त्याचे ग्राहक मुख्यत्वे मुस्लीम धर्मीयच आहेत. त्याने दिलेल्या परताव्याच्या आश्वासनाला भुलून त्याच्या बँकमध्ये ठेवी ठेवल्या गेल्या. काही दिवसांपूर्वी खान याचा व्यावसायिक भागीदार खालिद अहमद याने त्याच्यावर 4.8 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर खान याने सरकारी अधिकारी आपल्याला त्रास देत असून आपण आत्महत्या करत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. त्या व्हायरल क्लिपनंतर प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मात्र, शनिवारी तो दुबईला पळून गेल्याचं निष्पन्न झालं आहे. तसंच त्याने आयएमएमध्ये केलेल्या घोटाळ्याचा आकडा 1500 कोटी इतका झाल्याचंही उघड झालं आहे. त्यानंतर बुधवारी 12 जून रोजी आयएमएच्या सात अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.