
सामना प्रतिनिधी । शिरोळ
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील नवीन पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी खोदलेल्या खड्डयात पडून सिकंदर हसन मणेर (वय 64, रा. कुरुंदवाड) हा वृध्दाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुन्ना मणेर यांनी पोलिसात दाखल केली असून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित पालिका प्रशासन आणि विस्टाकोअर कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
कुरुंदवाड येथील नगर परिषदेने सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम विस्टाकोअर कंपनीला दिले आहे. हे काम 24 महिन्यात पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, कंपनीने कामात हलगर्जीपणा केल्यामुळे योजनेचे काम 3 वर्षांपासून रखडले आहे. या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत स्टॅन्डरोडवर असलेल्या मटण मार्केटच्या पाठीमागे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी विस्टा कंपनीने कोदकाम केले आहे. त्याठिकाणी कंपनीने मोठा खड्डा खणला आहे. या खड्याला पाणी साचल्याने या खड्ड्याचा अंदाज येत नाही. तसेच या पाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता आणि साथीचे रोग पसरले आहेत. याबाबत स्थानिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारही केली होती. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने खड्ड्यात पडून मणेर यांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम सभापती किरणसिंह जोंग, भाजप पक्षप्रतोद उदय डांगे, नगरसेवक दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शंकर तोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशामक दल व वजीर रेस्को फोर्सचे जवानांनी मणेर यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
वर्षभरापासून जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली मोठा खड्डा खणला आहे. या खड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. गेल्यावर्षी 18 जूनला या खड्यात 8 वर्षांचा मुलगा पडला होता. त्यावेळी स्थानिकांनी मुलाला वाचवले होते. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे शहर प्रमुख राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. कामात हजगर्जीपणा करणाऱ्या कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.































































