
पुण्यात भरधाव वेगातील टेम्पोचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वैद्यकीय शिक्षण (एमडी) घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कात्रज चौकात घडली. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला. मुख्य वर्दळीच्या चौकात अपघात घडल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. एकता प्रभाकर कोठावदे (वय 29) असे मयत तरुणीचे नाव होते. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता शनिवारवाडा परिसरात राहायला होती. शहरातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात तिचे एमडीचे शिक्षण सुरु होते. समोवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एकता दुचाकीवरुन कात्रज चौकातून स्वारगेटकडे चालली होती. त्यावेळी राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयासमोर अचानक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहू टेम्पोने एकताच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे खाली पडून ती गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रहदारीवेळी अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.


























































