काणकोण बायपासचे उद्धाटन; माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर, वीजमंत्री निलेश काब्राल आणि काणकोणचे आमदार ईजीदोर फर्नाडिस यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गावरील काणकोण बायपास रस्त्याचे उद्घाटन केले, सदर बायपास मार्गाला माजी मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर काणकोण बायपास असे नाव देण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग 66 वर हा बायपास रस्ता असून सुमारे 294 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आला आहे. 227 कोटी सीव्हील खर्चाचा त्यात समावेश आहे. या बायपास बांधकामात तळपण, गालजीबाग आणि माशे असे तीन पुलांचा समावेश आहे. 6.21 कि. मीटर रस्त्याची एकूण लांबी आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काणकोणमध्ये बायपास असणे हे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते आणि आता ते सत्यात उतरल्याचे सांगितले. सध्याचे प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प जे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत ते दूरदृष्टीचे नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी योजलेले प्रकल्प आहेत. मोपा विमानतळ, पत्रादेवी-करासवाडा बांबोळी रस्ता, जुवारी पूल, अनमोड हायव्हे, खांडेपार पूल आणि इतर प्रकल्प जे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत ते सर्व प्रकल्प म्हणजे स्व. पर्रीकरांचे स्वप्नातले प्रकल्प होते असे ते म्हणाले.

काणकोण बायपासमुळे वाहतूक वेळेच्या बचतीबरोबरच अपघात कमी होण्यासाठी मदत होणार आहे. काणकोण मतदारसंघाला समुद्रकिनारे, वनविभाग अशी संपऱ्ती लाभली आहे आणि त्याचा वापर स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी करण्याचे ते म्हणाले. वने आणि समुद्रकिनारे ही ईश्वराची देणगी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे सांगून इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आणि बफर झोनमध्य़े राहणाऱ्या लोकांची काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. काणकोण प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जात्मक सुविधा देण्यात येणार असून ट्रॉमा केंद्राचाही दर्जा सुधारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. येत्या दोन वर्षात सर्व विषय सोडविण्यात येणार असल्याचे सांगून बायपास रस्त्याची दोन्ही बाजुची जागा संपादित करून बायपासग्रस्त लोकांना योग्य असे मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

बाबुल सुप्रियो यांनी गोमंतकीयाच्या आणि गोव्याच्या विकासासाठी केंद्र सरकारर्फे सतत योगदान देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. उद्दीष्ठ साधण्यासाठी राज्य सरकार योग्य दिशेने कार्यरत असल्याचे ते म्हणाले. वनमंत्री असल्याने वन भागात राहणाऱ्या लोकांना मुलभूत पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मी स्वता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बायपास प्रकल्पाच्या उद्घाटनास माझा सहभाग असल्याचा मला अभिमान असल्याचे ते पुढे म्हणाले. दीपक पाऊसकर यांनी राज्यात सध्या हाती घेण्यात आलेल्या पूल, रस्ते यासारख्या विविध पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रूपये निधी उपलब्ध केल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या मदतीने सर्वांगीण विकास चालू असल्याचे ते म्हणाले. चालू प्रमुख प्रकल्पाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणार असून इतर चालू प्रकल्पांची कामे डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार आहेत.