भाईंदरमधील शिवसेनाप्रमुखांच्या कलादालनासाठी 25 कोटींचा निधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मीरा-भाईंदर शहरात सुरू होणाऱया कला दालनासाठी 25 कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासकामांचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत मुख्य सचिवांना निधी मंजूर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कलादालनाच्या कामाला गती मिळणार आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने भव्य कलादालन भाईंदर पूर्वेला आरक्षित जागेत उभे राहावे, असा प्रस्ताव शिवसेनेचे मीरा-भाईंदरचे संपर्पप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिकेला दिला होता. आमदार सरनाईक यांचा 25 लाख आमदार निधी, खासदार राजन विचारे यांचा 25 लाख खासदार निधी व शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा प्रत्येकी 12.50 लाखांचा निधी कलादालनासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आधीच दिला आहे. हे कलादालन सुसज्ज व भव्यदिव्य असावे, असा सरनाईक यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने कलादालनाच्या कामाला 25 कोटी निधी द्यावा, अशी मागणी सरनाईक सतत करीत होते. मात्र हा निधी फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झाला नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन समिती सभागृहात ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांच्या मागणीला तत्काळ पाठिंबा दिला. त्यावेळी कलादालनाच्या कामाला सरकारकडून 25 कोटी निधी देण्याची कार्यवाही करावी, या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केल्या. यावेळी राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते.

भव्य ग्रंथालय.. विरंगुळा केंद्र
मीरा – भाईंदरमधील कलाकार, कलाप्रेमी यांच्यासाठी ही बाळासाहेब ठाकरे कलादालनाची वास्तू हक्काची व कायमस्वरूपी प्रेरणा देणारी ठरणार आहे. या कलादालनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, जुनी पुस्तके असलेले भव्य ग्रंथालय, लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवण्याची जागा, विज्ञानाची आवड असलेल्या मुलांसाठी विशेष कक्ष, संग्रहालय, ई – लायब्ररी तसेच आपल्या कलेचे प्रदर्शन भरवण्यासाठी या कलादालनात जागा, मूर्तिकलेसाठी विशेष दालन अशा अनेक सुविधा या नियोजित कलादालनात असणार आहेत.
– प्रताप सरनाईक, आमदार.