नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. 15 दिवसांपूर्वी रोज हजाराच्या संख्येने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या चार दिवसांपासून चारशेच्या आत, तर आजची रुग्णसंख्या दोनशेच्या आत आली आहे.

दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात आज कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिका यांनी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

नव्याने आढळलेल्या 178 रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 35, खासगी प्रयोगशाळेत 66 आणि अँटीजेन चाचणीत 77 रुग्ण बाधित आढळले. नगर जिल्ह्यात 23 खासगी कोरोना सेंटर्स सुरू होती, तर प्रत्येक रुग्णालयात 20 टक्के राखीव खाटा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात ही मोहीम मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात आली. यात अनेक रुग्ण आढळून आले होते, तर काही रुग्णांवर तत्काळ उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते.

महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यासह प्रत्येक प्रभाग अधिकारी तसेच कर्मचाऱयांनी नगर शहरामध्ये महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविल्यामुळे रुग्णांची निश्चित संख्या कळू शकली. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही प्रभावीपणे ही मोहीम राबवून जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

95 टक्क्यांहून अधिक रुग्ण ठणठणीत

नगर जिल्ह्यात आज 178 बाधितांची भर पडली असून, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 56 हजार 153 झाली आहे. आज 100 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, आजवर 54 हजार 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांची एकूण संख्या 864 झाली असून, सध्या केवळ 1 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी 95 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील मृत्यूदरात घट

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या सांगली जिल्ह्याने गेल्या महिन्याभरात साथ नियंत्रणात आणण्यात यश मिळवले आहे. कोरोनाचा मृत्यूदर सध्या 3.63 टक्के इतका झाला असून, रुग्ण डबलिंगचा दरही 49 दिवसांपर्यंत वाढला आहे. तरीही सद्यस्थितीत अजूनही राज्यापेक्षा हा दर अधिक आहे.

एकूण रुग्णसंख्येचा विचार करता 92.45 टक्के रुग्ण बरे झाले असून, रुग्णसंख्येच्या वाढीचा आलेखही खाली येत आहे. जिल्ह्यात 30 ऑगस्ट रोजी कोरोना मृत्यूदर 4.08 टक्के, 30 सप्टेंबरला 3.67 टक्के इतका होता. ऑक्टोबर अखेरीस 3.63 टक्के आहे.

तीन महिन्यांनी रुग्ण शंभरीच्या आत

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे 99 रुग्ण आढळून आले असून, गेल्या तीन महिन्यांत आज पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. आज 176 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 45 हजार 184 झाली आहे. तर, 41 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 हजार 644 झाली आहे. सध्या 1 हजार 610 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या 99 रुग्णांमध्ये सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 29 रुग्णांचा समावेश आहे.