
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज 6 हजार 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 3 हजार 297 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला तर मृत्युदर 2.5वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 66 लाख 63 हजार 781 चाचण्या झाल्या असून 20 लाख 52 हजार 905 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 785 जण होम क्वारंटाइन असून 1 हजार 852 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
नागपुरात कोरोनाचा उद्रेक, 500 बाधित
नागपुरात कोरोनाचा आज उद्रेक झाला असून 500 बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. गुरुवारी 500 बाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत 137499 बाधित रुग्ण सापडले आहेत. 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले, रुग्ण बरे होण्याचा दर 95.35 टक्के आहे, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3547 रुग्णांची टेस्ट करण्यात आली, तर 1069 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत दिवसभरात 3 जणांचा मृत्यू, 624 कोरोनामुक्त
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 510 कोरोनाचे रुग्ण सापडले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 533 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 430 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 94 हजार 732 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 533 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 252 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 29 लाख 66 हजार 167 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 12 हजार 303 वर पोहोचली आहे.































































