
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या मुंबईला लॉकडाऊन तसेच नाईट कर्फ्यूची आवश्यकता नाही. गर्दीच्या ठिकाणी लोकांची कोरोना चाचणी केली जात असून सुपर स्प्रेडर तसेच रुग्णाच्या संपर्कात असलेल्या संशयित रुग्णांची शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लागण झालेला सुपर स्प्रेडर व्यक्ती तसेच कोरोना संशयित व्यक्तींची शोधमोहीम तीव्र केली आहे. मॉल, बाजारात, हॉटेल, फेरीवाले, खाऊ गल्ल्या, पब या ठिकाणी जाणाऱया प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्यात येत असून यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णावर वेळीच उपचार केला कोरोना प्रसाराला कारणीभूत ठरणाऱया सुपर स्प्रेडरला थांबवणे शक्य होणार आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी पालिकेच्या आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
कंटेन्मेंट झोनमधील हॉटेल, फेरीवाल्यांवर विशेष लक्ष
मुंबईत कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे कंटेन्मेंट झोनच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत सध्या 40 चाळी व झोपडपट्टी सील करण्यात आले आहेत तर 316 इमारती आणि तब्बल 4 हजार 921 मजले सील करण्यात आले आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष लक्ष ठेवले जात आहे. कंटेन्मेंट झोन भागातील फेरीवाले, हॉटेल व्यवसायिक, भाजीवाले आदींची कोरोना चाचणी करण्यात येणार असून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात हॉटेलमध्ये 50 टक्के ग्राहक उपस्थित असतात का, याकडेही लक्ष देण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
मॉलमध्ये प्रवेशासाठी 250 रुपयांत कोरोना चाचणी
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मॉल, रेल्वे स्थानके, एसटी महामंडळाची स्थानके या ठिकाणी येणाऱया प्रत्येक व्यक्तीला कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांची स्थानके, बस आगार या ठिकाणी कोरोनाची चाचणी मोफत केली जाणार आहे. परंतु खरेदीसाठी मॉल्समध्ये जाणाऱया प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाणार असून त्यासाठी 250 रुपये आकारण्यात येणार आहेत.
लोकसभाध्यक्षांना कोरोना
देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना लोकसभाध्यक्षांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.






























































