हिंदुस्थानचे लक्ष्य ‘मालिका विजय’; सूर्यकुमार किंवा पंतला मिळणार संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसोटी व टी-20 मालिका जिंकणारा यजमान हिंदुस्थानी संघ आता वन डे मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी रेडी झाला आहे. पहिल्या लढतीत इंग्लंडला धूळ चारत 1-0 अशी आघाडी घेणारी टीम इंडिया आता उद्या होणाऱया दुसऱ्या लढतीत विजय संपादन करून या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल. मात्र पक्के व्यावसायिक असलेला पाहुणा इंग्लंडचा संघही मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी नक्कीच सज्ज झालेला असेल. उभय संघांना दुखापतीमुळे आपल्या संघात बदल करावा लागणार आहे.

पदार्पणाची संधी

सलामीच्या लढतीत मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे मुंबईचा नव्या दमाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला उद्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, मात्र रिषभ पंतही मधल्या फळीतील दावेदार फलंदाज आहे. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने ‘टीम इंडिया’ला तसाही फारसा फरक पडणार नाही. कारण अनेक प्रतिभावान खेळाडूवर बाकावरून संधीची वाट बघत आहेत. त्यामुळे पदार्पण करणारा हिंदुस्थानचा प्रत्येक खेळाडू इंग्लंडसाठी धोकादायक ठरत आला आहे. कृणाल पांडय़ा व प्रसिध कृष्णा यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणात हिंदुस्थानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

रोहित शर्माला पहिल्या सामन्यात हाताच्या कोपराला दुखापत झाली होती, मात्र त्याची दुखापत गंभीर नसल्याचे कळते. मात्र रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय झाल्यास शुभमन गिलला त्याच्या जागेवर सलामीचा फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. फिरकीपटू कुलदीप यादवने 9 षटकांत 68 धावा दिल्या. त्यामुळे त्याच्या जागेवर युजवेंद्र चहलला खेळविले जाऊ शकते.

  • दुसरी वन डे
  • हिंदुस्थान–इंग्लंड
  • थेट प्रक्षेपण दुपारी 1ः30 पासून