
हिंदुस्थान–इंग्लंड यांच्यामधील नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट मालिकेत मैदानातील पंचांच्या ‘सॉफ्ट सिग्नल’मुळे वाद निर्माण झाला. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली याने ‘सॉफ्ट सिग्नल’ला कडाडून विरोधही केला. याची दखल घेत बीसीसीआयने 9 एप्रिलपासून सुरू होणाऱया आयपीएलमधून ‘सॉफ्ट सिग्नल’ला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता मैदानातील पंचांकडून तिसऱया पंचांची दाद मागण्यात येईल तेव्हा त्यांच्याकडून ‘सॉफ्ट सिग्नल’ देण्यात येणार नाही. त्यामुळे तिसरा पंच रिप्ले पाहून जो निर्णय देईल तो अंतिम असेल.
गोंधळ निर्माण होतो
मैदानातील एखाद्या घटनेबाबत पंच ठाम नसतील तेव्हा ते तिसऱया पंचांची मदत घेतात. यावेळी मैदानातील पंच त्या घटनेबद्दल त्यांना काय वाटते ते तिसऱया पंचांना आधी कळवतात. याला ‘सॉफ्ट सिग्नल’ म्हटले जाते. ‘सॉफ्ट सिग्नल’मुळे तिसऱया पंचांना आपला निर्णय देताना मदत होईल हे यामागील कारण असते. पण प्रत्यक्षात मैदानातील पंचांच्या ‘सॉफ्ट सिग्नल’मुळे तिसरा पंच गोंधळतो. त्यामुळे आता यापुढे तिसरा पंच रिप्ले पाहून जो निर्णय घेईल तोच अंतिम असेल. त्याला मैदानातील पंचांकडून ‘सॉफ्ट सिग्नल’ मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
90 मिनिटांमध्ये 20 षटके टाकायलाच हवीत
आयपीएलमध्ये यंदा 20 षटके ही 90 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायलाच हवीत असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी 90 मिनिटांच्या आधी किंवा नंतर 20वे षटक टाकले जात होते. पण यापुढे हे चालणार नाही. याचा अर्थ दीड तासामध्ये एक डाव पूर्ण व्हायलाच हवा, अन्यथा दंड आकारण्यात येणार आहे.
शॉर्ट रनवरही असणार तिसऱया पंचांची नजर
मागील आयपीएल मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील लढतीत शॉर्ट रनमुळे वाद निर्माण झाला होता. पंजाब संघाच्या व्यवस्थापनाने याविरोधात तक्रारही नोंदवली होती. याकडेही बीसीसीआयने गांभीर्याने लक्ष दिले आहे. नव्या नियमानुसार शॉर्ट रनवर आता तिसऱया पंचांची नजर असणार आहे. मैदानातील पंचांकडून शॉर्ट रनबाबत निर्णय देण्यात आल्यास तिसऱया पंचांना तो निर्णय बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
नो बॉल, सुपर ओव्हरसाठीही नियम
बीसीसीआयने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी नो बॉल व सुपर ओव्हर या नियमातही बदल केलेले आहेत. मैदानातील पंचांकडून नो बॉल देण्यात आल्यास त्यांचा निर्णय बदलण्याची मुभा तिसऱया पंचांना देण्यात आलेली आहे. अर्थात तिसरा पंच योग्य ती चाचपणी करून त्याबाबत निर्णय घेईल. तसेच एखादी लढत बरोबरीत (टाय) राहिली असता लढत संपल्यानंतर लवकरात लवकर सुपर ओव्हरचा खेळ संपायला हवा याकडेही तिसऱया पंचांचे लक्ष्य असणार आहे.



























































