व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेतल्यानंतर सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व आर्थिक संकटामुळे पिचलेल्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने लहान बचतीवरील व्याजदरात कपात करत मोठा धक्का दिला. मात्र काही तासातच केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला. याबाबत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विट करत हा आदेश नजरचुकीने जाहीर झाल्याचे म्हटले होते. त्यावरून आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निर्मला सितारामन यांना घरचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी ट्विटरवरून मंत्रालयाला टोला लगावला आहे.

‘आश्चर्यकारक! अर्थमंत्रालयाला नजरचुकीची समस्या आहे? संपूर्ण मंत्रालयाला नजरचुकीची समस्या जाणवतेय?’ असा टोला स्वामी यांनी ट्विटरवरून लगावला आहे. निर्मला सितारामन यांनी आज सकाळी ट्विट करत ‘व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीने झाल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर स्वामी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

अशी होणार होती व्याजकपात

– पीपीएफवरील व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 6.4 टक्के केला आहे. 0.7 टक्क्यांनी ही कपात केली आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ही व्याजदर कपात असेल.
– मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक पालक सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करतात. मात्र या योजनेत व्याजदरात 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.
– ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्किममधील गुंतवणुकीवरील व्याजदरात 90 बेसिक पॉईंटने कपात केली आहे. आता 6.5 टक्के एवढा व्याजदर राहील.
– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (एनएससी) व्याज दर 6.8 टक्क्यांवरून 5.9 टक्के केला आहे. तब्बल 0.9 टक्के व्याजदर कपात आहे.