सहा दिवसांचे टेन्शन संपले; कोब्रा कमांडर राकेश्वर यांची नक्षल्यांच्या कैदेतून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडच्या जंगलातून अपहरण केलेल्या कोब्रा कमांडर राकेश्वर सिंह मनहास यांना नक्षल्यांनी अखेर गुरुवारी सोडून दिले. नक्षल्यांनी मागील सहा दिवस राकेश्वर यांना कोंडून ठेवले होते. सरकारने नेमलेले मध्यस्थ पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया यांच्यासह शेकडो स्थानिक लोकांच्या हजेरीत नक्षल्यांनी राकेश्वर यांना मुक्त केले.

नक्षल्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर राकेश्वर यांना बटालियन कॅम्प क्रमांक 168 मध्ये नेण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या सुटकेची बातमी समजल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तसेच राकेश्वर यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. 3 एप्रिलला विजापूरच्या जोगागुडा जंगल परिसरात नक्षली आणि सुरक्षा दलांमध्ये तुफान चकमक झाली होती. त्यात सुरक्षा दलाचे 23 जवान शहीद झाले होते. त्या चकमकीवेळी राकेश्वर सिंह हे बेपत्ता झाले होते.

त्यानंतर नक्षल्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले व राकेश्वर यांना आपल्या कैदेत ठेवल्याचे कबूल केले होते. मात्र याचवेळी सरकारने चर्चेसाठी मध्यस्थाचे नाव घोषित करावे, नंतरच अपहरण केलेल्या जवानाला सोडून देऊ, अशी अट नक्षल्यांच्या प्रवक्त्यांनी घातली होती. त्यामुळे सीआरपीएफसह राकेश्वर यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अखेर सहा दिवसांनी गुरुवारी राकेश्वर यांच्या सुटकेची बातमी पुढे आली.

नक्षल्यांच्या अटीबाबत अजून स्पष्टता नाही

राकेश्वर यांच्या घरवापसीबाबत त्यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली होती. त्यानंतर सरकारने पद्मश्री धर्मपाल सैनी आणि तेलम बोरैया यांचे मध्यस्थ पथक नेमले. त्यांनी केलेल्या मध्यस्थीवेळी नक्षल्यांनी कोणत्या अटीवर राकेश्वर यांना सोडले, हे अजून स्पष्ट झालेले नाही.