
हवामान खात्यातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि झारखंडची राजधानी रांची येथील वेधशाळेचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांचे आज अल्पशा आजाराने रांची येथे निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील रहिवासी असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती यांच्या अकाली निधनाने हवामान खात्याबरोबरच धर्माबाद व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हवामान क्षेत्रातील अभ्यासू वैज्ञानिक अशी ओळख असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी यापूर्वी गोवा येथे हवामान खात्यात संचालक म्हणून काम पाहिले. पुणे, शिलाँग, श्रीनगर इत्यादी ठिकाणीही त्यांनी हवामान विभागात अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती स्व. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतील “पर्वत” या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्वही डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी केले होते. जम्मू- कश्मीरच्या सीमेवरील दुर्गम ठिकाणांवर व सियाचेनसारख्या गोठवून टाकणाऱ्या थंडीत हिंदुस्थानी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना हालचालींसाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून प्रत्यक्ष आर्मी युनिटमध्ये तळ ठोकून हवामानाच्या सखोल अभ्यासासह लष्कराच्या कामात मोलाची मदत करण्याची जबाबदारीही डॉ. पडगलवार यांनी पार पाडली होती.
आयआयटी, भागलपूर या शैक्षणिक संस्थेचे पहिले कुलसचिव म्हणूनही त्यांची निवड झाली होती. आयआयटी सारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्थेची रजिस्ट्रार म्हणून घडी बसवल्यानंतर डॉ. पडगलवार हे परत हवामान खात्यात परतले होते.
























































