मंथन – तुमचा स्टार्टअप सुरक्षित आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऍड. शिवांगी झरकर

संपूर्ण हिंदुस्थानात विशेषतः महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर भागांत कोविड-19ने थैमान मांडले आहे आणि पुन्हा आपण मागील वर्षाप्रमाणे लॉक डाऊनच्या भोवऱयात अडकलो आहोत. त्यामुळे एकच प्रश्न सतावतो आहे, Whats Next? कॉन्ट्रक्टवर असलेले उद्योग ज्यात या छोटय़ा SMEs मोठय़ा कंपनीवर अवलंबून असतात त्यांची लॉक डाऊनमुळे गंभीर स्थिती झाली आहे. अशा या बिकट परिस्थितीत तुमचा स्टार्टअप कसा सुरक्षित राहणार?

आज हजारो मॅनेजमेंट आणि इंजिनीअरिंगची होतकरू मुले देशात स्टार्टअप सुरू करू इच्छितात. काही जणांनी तर स्वतःकडचे भांडवल जुळवून स्टार्टअप सुरूही केलेय. परंतु सध्याच्या बिकट परिस्थितीत त्यांच्या स्टार्टअपचा निभाव कसा लागणार? आज ना उद्या सरकारी फंड स्टार्टअपला मिळेल, कोणी इन्व्हेस्टर फंड देईल अशा वेडय़ा आशांनी त्यांची स्वप्नं रात्री जागवतात, तरुण पिढी स्वतःच्या हुशारीला, ज्ञानाला, शिक्षणाला एका सुंदर अशा कल्पनेत रोवते, एका लहान बाळाप्रमाणे सांभाळते, त्याला जगासमोर आणते आणि अशी काही फसवणूक होते की, स्टार्टअप कल्पना एका झटक्यात चोरी होते… तुमच्याच एखाद्या मित्र/पार्टनरमुळे विकली जाते… मग हाती लाभते निराशा व फसवणूक.

कोविड-19मुळे उद्योगधंद्यावर जे परिणाम झाले आहेत त्यात सर्वात जास्त फटका हा स्टार्टअप उद्योगांना बसला आहे. उद्योजक तोच, जो संकटातसुद्धा काही ना काही उद्योग करत राहतो, लढत राहतो. परंतु या लढाईत आपल्याच माणसांकडून घातपात झाला तर कायद्याच्या सुरक्षितेचे ब्रम्हास्त्र्ा त्यादृष्टीने आधी तयार ठेवायचे की नाही, हे तुम्हीच ठरवायला हवे.

आज प्रत्येकाला वाटते की, आपला उद्योग सुरक्षित राहावा, सर्व आर्थिक, औद्योगिक संकटांवर मात करावी आणि तुमचा सर्वांगीण विकास व्हावा. मात्र त्यासाठी त्या उद्योगाला कायद्याचे कवचकुंडल हवे. अशा या नवजात स्टार्टअपलासुद्धा ‘कायद्याच्या लसीकरणा’ची गरज आहे. आज वेळ आहे त्याला सुरक्षित करण्याची. त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाची ऍग्रीमेंट आणि कागदपत्रे. या गोष्टी येणाऱया शंभर संकटांपासून दूर ठेवतात व तुमचा उद्योग चिरकाल टिकू शकतो, वाढू शकतो.

अशाच काही महत्त्वाच्या कागदपत्रांची/ऍग्रीमेंटची यादी पुढीलप्रमाणे आहे…

प्रश्न 1 ः तुम्ही जेव्हा तुमच्या को-फाऊंडर, असोसिएट, सहयोगी यांच्यासोबत तुमच्या बिझनेस कल्पना, प्लॅन उद्योग सुरू करताना मांडता तेव्हा त्यांच्यासोबत आधी को-फाऊंडर ऍग्रीमेंट सही करून घेतले का?
कारण ः को-फाऊंडर ऍग्रीमेंटमुळे सर्व उद्योजकांच्या भूमिका, जवाबदाऱया स्पष्ट राहतात, पारदर्शकता वाढते व वाद कमी होतात.
प्रश्न 2 ः तुम्ही जेव्हा तुमच्या स्टाफ/एम्प्लॉईज/ लेबर यांच्यासोबत तुमच्या उद्योगाची महत्त्वाची माहिती, तुमच्या अकाऊंटची माहिती, तुमचे इतर IPR (ट्रेड मार्क, पेटंट, कॉपीराईट) तसेच इतर माहिती शेअर करता तेव्हा त्यांच्यासोबत आधी एम्प्लॉईज/टीम-फाऊंडिंग ऍग्रीमेंट सही करून घेतले का?
कारण ः कधी कधी तुमचा स्टाफ/एम्प्लॉईज हा तुमची गुप्त माहिती तुमच्या स्पर्धकाला देऊ शकतो किंवा तुमचा प्रतिस्पर्धी बनू शकतो.
प्रश्न 3 ः तुम्ही जेव्हा तुमच्या गुंतवणूकदार / Venture Capitalists (VC) यांना भेटून तुमचा बिझनेस प्लॅन मांडता तेव्हा त्यांच्यासोबत आधी नॉन-डिस्क्लोझर ऍग्रीमेंट सही करून घेता का?
कारण ः नॉन-डिस्क्लोझर ऍग्रीमेंट तुमची उद्योग कल्पना, योजना, नकल आणि चोरी करणाऱयांपासून सुरक्षित ठेवते.
प्रश्न 4 ः तुमचा उद्योग सरकारी नियमांप्रमाणे आणि कायद्यांप्रमाणे सुरक्षित आहे का, याची खातरजमा करून घेतली का?
कारण ः विविध कर, लायसेन्स, सरकारी नियम, कायदे यांची माहिती असणे आवश्यक आहे.
प्रश्न 5 ः गुंतवणूकदारांसोबत तुम्ही शेअर होल्डर/इन्व्हेस्टर ऍग्रीमेंट सही करून घेतले का?
कायदा ः गुंतवणूकदाराला त्याच्या इन्व्हेस्टमेंटची संपूर्ण कायदेशीर माहिती असते आणि त्याची फसवणूक होत नाही.
प्रश्न 6 ः तुमच्या स्टार्टअप असोसिएट (उदा. वकील, CA, CS, बिझनेस कोच) सोबत तुम्ही बिझनेस असोसिएट/कन्सल्टंट ऍग्रीमेंट सही करून घेतले का?
कारण ः तुमचे स्टार्टअप असोसिएट हे ऍग्रीमेंटमुळे कायदेशीररीत्या तुमच्याशी बांधले जातात आणि दिलेली कामे चोख ठरलेल्या पैशात पार पडतात.
प्रश्न 7 ः तुमची इंटलेक्चुअल प्रॉपर्टी (IP) रजिस्टर आहे का?
कारण ः ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट जर रजिस्टर नसतील तर उद्योगाचा लोगो, नाव आणि माहितीची चोरी होऊ शकते.
प्रश्न 8 ः तुमच्या स्टार्टअप कंपनीची प्रायव्हेट पॉलिसी रजिस्टर आहे का?
कारण ः स्टार्टअप कंपनीची प्रायव्हेट पॉलिसी रजिस्टर असेल तर तुमची गुप्त माहिती, उद्योग रचना चोरीला जाऊ शकत नाही आणि क्लाएंट, फ्रँचायझी आणि इतर लोकांचा त्रास कमी होतो.
प्रश्न 9 ः तुमच्या वेबसाईटची किंवा मोबाईल ऍपची टर्म ऑफ युझ (Term Of Use ) ऍग्रीमेंट, प्रायव्हेट पॉलिसी (Private Policy) तुमच्या वेबसाईटची किंवा मोबाईल ऍपवर टाकली आहे का?
कारण ः ग्राहक कायदे, सायबर कायदे अतिशय कडक झाल्यामुळे ऑनलाईन व्यवसाय, पैशाचा व्यवहार करताना सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे.
प्रश्न 10 ः तुम्ही तुमचा उद्योग उद्यममध्ये रजिस्टर केला आहे? तुम्ही तुमचा स्टार्टअप DPIIT / DIPP योजनेमध्ये रजिस्टर केला आहे का?
कारण ः त्यामुळे कर्ज आणि गुंतवणूक मिळणे सोपे जाते.

वरील सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरे तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुमचा स्टार्टअप कायदेशीररीत्या सुरक्षित आणि विकासाच्या दृष्टीने सक्षम आहे. तुमचा उद्योग सुरक्षित, समृद्ध राहावा आणि प्रगती होत जावी यासाठी वरील सर्व कागदपत्रे तयार करावीत. कारण खबरदारी नेहमीच फायदेशीर ठरते!

– www.advshivangi.com
(Founder of Law Fleeter Adv. Shivangi)