
पती त्रास देत असल्यास पत्नीला घरगुती हिंसाचार कायद्याखाली पतीविरुद्ध तक्रार करता येते; पण जर पत्नीकडून त्रास दिला जात असेल तर पतीसाठी असा कायदाच नाही. याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
पत्नीच्या छळाला पंटाळून पतीने घटस्फोटासाठी अपील केले होते. हे अपील कौटुंबिक न्यायालयाने मान्यही केले. मात्र घटस्फोटाला मंजुरी मिळविण्याच्या चार दिवस आधी पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली पतीविरुद्ध तक्रार दिली. त्यामुळे पतीची नोकरीही गेली. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. सुनावणीवेळी न्यायमूर्ती एस. विद्यानाथन यांनी चिंता व्यक्त करताना स्पष्ट मत मांडले. तसेच त्या व्यक्तीला नोकरीवर परत घेण्याचे आदेश संबंधित व्यवस्थापनाला दिले.
न्यायालयाने काय म्हटले?
- महिला घरगुती हिंसाचार कायद्याखाली पुरुषाविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. मात्र, जर महिलेकडून पुरुषाचा छळ झाला तरी तो या कायद्याखाली तक्रार दाखल करू शकत नाही, कारण पुरुषांसाठी असा कायदाच नाही.
- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत मान्यता दिल्यानंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
- सध्याच्या पिढीने लक्षात ठेवायला हवे की, विवाह म्हणजे कॉण्ट्रक्ट नाही, तर पवित्र संस्कार आहे.
- पती-पत्नीने इगो, आपले मतभेद बाहेर ठेवून घरामध्ये प्रवेश केला पाहिजे; अन्यथा मुलांच्या आयुष्यावर याचा खोलवर परिणाम होतो.



























































