
>> भाऊ कोरगांवकर
मुलांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत दक्ष राहत शिक्षणाचा दर्जा कसा उंचाकला जाईल याबाबत मराठी शाळांनी एक पाऊल पुढे टाकले. याचा चांगला परिणाम होत आहे. आता अनेक पालक आपल्या मुलांसाठी
मराठी शाळांनाच प्राधान्य देत आहेत. एकूणच आता मातृभाषेतील शिक्षणाचं चित्र बदलत आहे.
कोरोना काळाने सर्व जग वेठीस धरले आहे. त्यात शिक्षण क्षेत्रसुद्धा होरपळले आहे. या काळात काही मराठी शाळांतील प्रभावी शिक्षणतंत्रामुळे मराठी शाळांना चांगले दिवस आले आहेत.
कोरोना काळात शिक्षण देण्यासाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू सर्वच माध्यमाच्या शाळांचे संस्था संचालक, शिक्षक अद्ययावत शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत आहेत.
डिजीटल शिक्षणामुळे काही विद्यार्थी मात्र शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्याला कारण नेट उपलब्धेत खंड, साधन सुविधांचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थी-पालक त्रस्त आहेत. शैक्षणिक आविष्कारापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मातृभाषेतील शिक्षणाचा ओढा लागला. आपला पाल्य मातृभाषेतून शिक्षण घेईल तर त्याची शैक्षणिक प्रगती होईल असे पालकांना वाटू लागले.
सरकारने कोरोना काळात सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे ठरविले. ज्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास निर्धोकपणे चालला आहे. परंतु ज्या काही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कुठल्याच सोयी उपलब्ध नाहीत त्यांना सरकारी नियमाप्रमाणे वरच्या वर्गात प्रवेश मिळाला, तरी मुळात त्या वर्गात जाण्यासाठी अपुऱया अभ्यासामुळेच पात्रता नसल्यामुळे संदिग्धता निर्माण झाली. काही पालकांनी तर शाळेला कळविले, माझ्या पाल्याला त्याच वर्गात ठेवा. तर काही पालक आपल्या पाल्याची उत्कृष्ट तयारी करून घेणाऱया मराठी शाळांचा शोध घेऊ लागले.
काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन क्लासपासून दूर ठेवले. याउलट मराठी शाळेचे संस्था संचालक-शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अनेक योजना आखतात. कुठल्याही परिस्थितीत आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेप्रमाणे शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी धडपडत आहेत. ज्या पालकांची कोरोना काळातही सक्षम परिस्थिती आहे ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांना, त्यांच्या योजनांना सतर्कतेने सहकार्य देतात. परंतु कोरोना काळात पोटाची चिंता असलेले पालक मनात असूनसुद्धा पाल्याच्या शिक्षणाला दुय्यम दर्जा देतात. अशा पालकांना मराठी शाळा आधार वाटू लागल्या आहेत.
काही मराठी शाळांनी आपल्या शाळेत इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिले तर काही शाळांनी सेमी इंग्रजी सुरू करून आम्ही आपल्या मुलांना इंग्रजीत कमी पडू देणार नाही याची जणु काही हमीच दिली. काही शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा तसेच शालेय इमारती यात सुधारण केली. त्यामुळे आज बरेच पालक आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दर्जेदार मराठी शाळा शोधू लागले आहेत. ज्या शाळा पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याची हमी देतात, अशा शाळेत आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून काढून मराठी शाळेत टाकताहेत. याला प्रमुख कारण म्हणजे मराठी शाळेच्या संस्था संचालकांनी मराठी शाळांना ओहोटी का लागली याचा व्यवस्थित अभ्यास केला. स्वतःमध्ये शिक्षकांमध्ये, शिक्षकेतर कर्मचाऱयांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. ‘कायदा पाळा, गतीचा थांबला तो संपला’ या उक्तीनुसार हा बदल होय. कोरोना काळात ‘फी’साठी नव्हे तर मुलाच्या अभ्यासासाठी पालकांच्या मागे तगादा लावला. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत विशेष दक्षता घेतली जाउै लागली.
आज ज्या मराठी शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा अधिक उत्तम केला, त्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांची पावले वळू लागली.
सरकारने एक नवीन धोरण आखले आहे. इंजिनीअरिंग महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून सुरू करण्याचे, यामुळे मराठी पालकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
माझी तर अशी कल्पना आहे की, मराठी माध्यमाच्या शाळांना आय.सी.एस.सी., सी.बी.एस.सी. दर्जाप्रमाणे शिक्षण प्रणाली स्वीकारण्यासाठी उद्युक्त करावे. म्हणजे आय.सी.एस.सी., सी.बी.एस.सी. शाळा पण मराठी माध्यमातून. असे झाले तर मराठी माध्यमाच्या शाळांना सोन्याचे दिवस येतील.
अर्थात हे सारे ज्या मराठी शाळा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवतात, त्यांनाच याचा फायदा होईल. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ म्हणणारे मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त होत जातील व मराठी माध्यमाच्या शाळांचं आता काय खरं नाही हेच बोलत राहतील.
माझ्या माहितीतील काही शाळांतील शिक्षक कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण घेण्याची अडचण आहे, अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करू लागले व पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत हमी देऊ लागले. काही शाळांनी कुठल्या ना कुठल्या संस्थेची मदत घेऊन कोरोना काळात गरीब पालकांना धान्यवाटप, इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणे आदी गोष्टींकडे लक्ष दिले. अर्थात इंग्रजी माध्यमातील शाळांना या गोष्टींची गरज भासली नाही, कारण पालक सधन आहेत. परंतु अंशतः पालकांनी आपली ऐपत नसतानासुद्धा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे. ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा पालकांना आता मराठी शाळा जवळच्या वाटू लागल्या. त्यांची पावले मराठी माध्यमाच्या शाळेकडे वळू लागली. पूर्वी मराठी शाळेतील शिक्षकांचे व पालकांचे जिव्हाळ्याचे नाते होते ते पुन्हा दिसू लागले. आपल्या पाल्याकडे वैयक्तिक लक्ष देणाऱया मराठी माध्यमाच्या शाळा पालक शोधू लागले.
(लेखक महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक
संस्थापक तसेच प्रबोधन कुर्ला शाळेचे अध्यक्ष आहेत)




























































