
नीटनंतर इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनने मेडिकल प्रवेशासाठी होणारी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये मेडिकल सीईटी दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यातील परीक्षा 4 ते 10 सप्टेंबरदरम्यान तर दुसऱया टप्प्यातील परीक्षा 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक आठवडाभरासाठी पुढे ढकलावे, अशी मागणी असोसिएशनने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
12 सप्टेंबरला नीटची परीक्षा होणार असून सीबीएसईची बारावीची फेरपरीक्षा 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच देशातील बीएसस्सी प्रवेशासाठी होणारी आयसीएआर ही परीक्षा 7, 8 व 13 सप्टेंबरला होणार असून कर्नाटक CoMEDK ही परीक्षा 14 सप्टेंबरलाच होत आहे. त्यामुळे या सर्व परीक्षांच्या तारखा एकाच वेळी येत असल्याने सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती उदय सामंत यांना केली असल्याचे असोसिएशनच्या अॅड. अनुभा सहाय यांनी सांगितले.



























































