25 वर्ष निर्वस्त्र राहिलेले जैन मुनी लग्न करणार, आश्रमातल्याच एका महिलेसोबत संसार थाटण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील दमोहमधल्या बेलाजी जैन तीर्थ इथे राहणाऱ्या आणि चातुर्मासाचे व्रत अंगीकारलेल्या जैन मुनींनी संन्यास सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 वर्ष ते संन्यस्त आयुष्य जगले असून त्यांनी दोन वेळा दिक्षाही घेतली आहे. मुनिश्री शुद्धात्म सागर जैन असे या मुनींचे नाव आहे. 25 वर्ष अंगावर एकही कपडा धारण न करणाऱ्या या मुनींनी आश्रमातच भेटलेल्या एका महिलेसोबत संसार थाटणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे भक्त आश्चर्यचकीत झाले आहेत.

मुनी शुद्धात्म हे आश्रमात राहून चातुर्मास करत होते. 22 जुलैला ते आश्रमात आले होते. ते येण्याच्या काही दिवस आधी आग्र्याहून प्रज्ञा दिदी नावाची महिला आश्रमात आली होती. मुनी आणि दिदी यांच्यातील संभाषण दिवसेंदिवस वाढायला लागलं, ज्यामुळे आश्रम प्रशासन या दोघांवर संतापलं होतं. यामुळे या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मुनींनी आरोप केला आहे की बेलाजी जैन तीर्थच्या काही लोकांनी त्यांना मारहाण करून त्रास दिला. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

आश्रमातून बाहेर काढल्याने संतापलेल्या शुद्धात्म सागर यांनी आपण गृहस्थाश्रम स्वीकारणार असून प्रज्ञा दिदीसोबत पुढील आयुष्य व्यतित करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. प्रज्ञा यांचं म्हणणं आहे की त्यांच्यात आणि शुद्धात्म सागर यांच्यात फोनवरून बातचीत व्हायची. आम्ही दोघेही कधीही चुकीचे वागलो नाही, मात्र तरीही आम्हाला आश्रमातून बाहेर काढण्यात आलं. झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.