
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन निवासामध्ये (एमटीडीसी) कोकणातील पहिलाच उपक्रम म्हणून खास पर्यटकांच्या सेवेसाठी प्रदूषणमुक्त दोन बॅटरी कार आणण्यात आल्या आहेत. एमटीडीसीने स्वखर्चातून या बॅटरी कार आणल्या आहेत. या बॅटरी कारचा शुभारंभ गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाल्यानंतर या बॅटरी कार पर्यटकांच्या सेवेसाठी नुकत्याच एमटीडीसी रिसॉर्ट गणपतीपुळे येथे सुरू करण्यात आल्या आहेत.
गेल्या गुरुवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीपुळे येथे विविध कार्यक्रमासाठी आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या बॅटरी कारची पाहणी करून ही कार स्वतः चालवण्याचा आनंद घेतला. त्याच बरोबर कोकणामध्ये एमटीडीसीच्या असलेल्या पाच रिसॉर्टपैकी सर्वप्रथम गणपतीपुळे येथे दोन बॅटरी कार आणल्याबद्दल एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यामुळे येथील पर्यटकांना संपूर्ण गणपतीपुळे एमटीडीसी परिसरात असलेल्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना अतिशय आकर्षक पद्धतीने असलेल्या एमटीडीसी परिसराचा आनंद उपभोगता येणार आहे. त्याशिवाय विशेष म्हणजे गणपतीपुळे येथे एमटीडीसीच्या मालकीचे समुद्रकिनारी असलेले तंबू निवास अर्थात कोकणी हट सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मुख्य एमटीडीसी पर्यटन निवास पासून तंबू निवासकडे जाणाऱ्या पर्यटकांना पायी चालत जावे लागते. तसेच तंबू निवासातून पुन्हा एमटीडीसीकडे येण्यासाठी पायीच यावे लागत होते. या सर्व गोष्टींचा विचार करून गणपतीपुळे एमटीडीसीने बॅटरी कार आणून पर्यटकांना कमी वेळेमध्ये निवास ठिकाणी पोहोच करण्यासाठी बॅटरी कार आणल्या आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून कोकणामध्ये पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्या अनुषंगाने एमटीडीसी सारख्या मोठ्या पर्यटन निवासात देखील पर्यटक कमी संख्येने येऊ लागले आहेत. परंतु पुन्हा एकदा शासनाने कोरोनाच्या निर्बंधांमध्ये विशेषतः पर्यटन उद्योगाला पुन्हा चालना दिल्याने सध्या पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना नाविन्यपूर्ण सोयीसुविधांनी आकर्षित करण्याच्या हेतूने गणपतीपुळे एमटीडीसीने बॅटरी कारचा उपक्रम राबवला आहे. एमटीडीसीचे कोकणामध्ये हरिहरेश्वर, कुणकेश्वर, वेळणेश्वर, तारकर्ली, गणपतीपुळे असे पर्यटन निवास आहेत. मात्र या सर्व निवासांमध्ये गणपतीपुळे हे सर्वात मोठ्या आर्थिक उलाढालीचे व जास्त उत्पन्नाचे पर्यटन निवास म्हणून ओळखले जाते. तसेच याच रिसॉर्टला पर्यटकांची मोठी पसंती असते. म्हणून सर्वप्रथम याच पर्यटन निवासामध्ये बॅटरी कार आणण्याचा निर्णय एमटीडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या बॅटरी कार चार्जिंगवर चालणारी असून सुमारे पाच तास चार्जिंग करावी लागते. तसेच या बॅटरी कारमध्ये सात पर्यटकांना बसण्याची क्षमता आहे. अतिशय चांगल्या प्रकारची ही कार असल्याने पर्यटकांना आता एमटीडीसीच्या परिसराचा आनंद उपभोगता येणार आहे. एकूणच सध्या गणपतीपुळे येथे एमटीडीसीने बोट क्लबचा साहसी जल पर्यटनाचा पर्यटनाचा उपक्रम सुरू केल्यानंतर आता बॅटरी कार देखील पर्यटकांच्या सेवेसाठी आणल्याने गणपतीपुळे एमटीडीसी पर्यटक निवास पर्यटकांचे खास आकर्षण ठरेल, असे मत संपूर्ण गणपतीपुळे परिसरातील पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त आहे. तसेच गणपतीपुळे पर्यटन निवासाकडे विविध ठिकाणच्या पर्यटकांचा कल आता अधिकाधिक वळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
























































