
कोरोना संकटामुळे गेल्या वर्षापासून बंद असलेल्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारात आज प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत अनेकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत होते. दरम्यान, नगर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसतानाच अशा प्रकारे गर्दी झाल्यास रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घोडेगाव येथे दर शुक्रवारी भरणाऱया आठवडे बाजारात राज्यासह परराज्यातील म्हशी विक्रीसाठी येतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून हा बाजार बंद होता. त्यामुळे कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या दारात असलेली जनावरे विकली गेली नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे ठाकले होते. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. आज घोडेगावचा बाजार सुरू झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, बाजारातील गर्दी धडकी भरवणारी होती. आज भरलेल्या बाजारात रात्रीपासून जनावरांनी भरलेली वाहने मुक्कामी आल्याने बाजारात प्रचंड गर्दी झाली. एक हजाराहून अधिक जनावरे दाखल झाली होती. दिवसभर मोठय़ा प्रमाणात जनावरांची विक्री झाली. यातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
वर्षभराने बाजार सुरू झाला आहे. कोरोनाचे संकट अजून गेले नाही. मात्र, बाजारात प्रचंड गर्दी वाढल्याने नियमाला मात्र हरताळ पाहायला मिळाला. अनेक शेतकरी, व्यापाऱयांच्या तोंडावर मास्क दिसले नाहीत. तसेच सोशल डिस्टन्सचाही अभाव दिसून आला. बाजार समिती प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना करण्यात न आल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

























































