
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण कोकणपट्टीसह पालघर जिह्यातही मुसळधार पाऊस झाल्याने धामणी, कवडाससह सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. धुवाधार पावसामुळे पालघर जिल्हा ‘वॉटरफूल’ झाला असून जिल्हावासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
पालघर जिह्यात ऐन गौरी-गणपतीच्या सणातच गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमशान घातले आहे.यामुळे जिह्यातील सर्व मुख्य, मध्यम आणि लघु धरण प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने सूर्या प्रकल्पांतर्गत येणारे धामणी धरण 100 टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्याने सोमवारी सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले. हे सर्व दरवाजे 100 सेंटीमीटर इतके उचलल्याने सूर्या नदीपात्रात सुमारे 40 हजार 134 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कवडास धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.
शेती, उद्योगालाही मुबलक पाणी
रब्बी हंगामात डहाणू आणि पालघर तालुक्यातील जवळपास 8 हजार हेक्टर जमिनीवरील शेती क्षेत्राला सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. डहाणू येथील अदानी औष्णिक ऊर्जा प्रकल्प, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी आदी मोठे उद्योग प्रकल्प धामणी धरणाच्या पाण्यावरच पूर्ण अवलंबून आहेत.
नदीकाठच्या गावांना सतर्पतेचा इशारा
सूर्या नदीकाठालगतच्या ग्रामीण भागातील लहान साकव आणि पूल पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे डहाणू आणि पालघर तालुक्यातील सूर्या नदी काठावरील गावांना महापुराचा धोका लक्षात घेऊन सतर्पतेचा इशारा देण्यात आला आहे.




























































