
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही नवीन कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र यानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून संयुक्त किसान मोर्चाने हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. अशातच आज दिल्ली येथील इको गार्डन पार्क संयुक्त किसान मोर्चाने महापंचायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच एमएसपीसाठी कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शेतकरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
एमएसपी बाबत कायदा करावा, आपल्या या मागणीवर संयुक्त किसान मोर्चा ठाम आहे. शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले आहे की, एमएसपीच्या प्रश्नावरून केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. याबाबत बोलताना शेतकरी नेते हरिनाम सिंग वर्मा म्हणाले आहेत की, कृषी कायदे मागे घेणे, ही निव्वळ नौटंकी आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले आहेत.
हरिनाम सिंग वर्मा म्हणाले की, ”शेतीविषयक कायदे संसदेने संमत केले आहेत, तर ते संसदेतूनच परत मागे घेतले पाहिजेत. यासाठी टीव्हीवर येऊन वक्तव्य करण्याची गरज नाही.” ते म्हणाले, जोपर्यंत एमएसपी संबंधित कायदा करून त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच ठेवणार आहेत.




























































