
कसोटी मालिकेतील पराभवानंतर आत्मविश्वास गमावलेल्या टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेतील पराभवाची मालिका कायम राहिली आहे. पार्लच्या दुसऱ्या वन डे लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकन संघाने हिंदुस्थानला चारी मुंडय़ा चीत करीत 7 विकेट आणि 11 चेंडू राखून पराभूत करीत एकदिवसीय क्रिकेट लढतीची मालिकाही जिंकली. तीन लढतीच्या मालिकेत यजमानांनी 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
विजयासाठी हिंदुस्थानने समोर ठेवलेले 288 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकन संघाने अगदी व्यावसायिक ढंगाने केवळ 3 विकेट गमावून 48.1 षटकांत पार केले. सलामीवीर जानेमन मलान (108 चेंडूंत 91) आणि क्विंटन डिकॉक (66 चेंडूंत 78) हे यजमानांच्या शानदार विजयाचे शिल्पकार ठरले.
दक्षिण आफ्रिकन दौऱ्यातील टीम इंडियाच्या गोलंदाजांचा फ्लॉप शो आजही कायम राहिला. दक्षिण आफ्रिकन फलंदाजीला वेसण घालण्यात ते पुन्हा अपयशी ठरले. फलंदाजीला अनुकूल ठरणाऱ्या पार्लच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी वेगवान आणि फिरकी माऱ्याला समर्थपणे तोंड देत धावांचा ओघ कायम राखला. टीम इंडियाचे कागदावर शेर वाटणारे गोलंदाज दक्षिण आफ्रिकन भूमीवर पार ढेर झाल्याचे चित्र आज पुन्हा दिसले. त्यातल्या त्यात अष्टपैलू खेळी करणारा शार्दूल ठाकूर 35 धावांत 1 विकेट आणि जसप्रीत बुमराह 37 धावांत 1 विकेट यांनाच काहीसे यश लाभले.
पंतची धडाकेबाज खेळी दिलासादायक
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण आज शिखर धवन (29) आणि माजी कर्णधार विराट कोहली (0) पार फ्लॉप ठरले. संघाच्या डावाला आकार देण्याचे काम केले ते यष्टिरक्षक रिषभ पंत (71 चेंडूंत 85), दैवाची साथ लाभलेला कर्णधार के.एल. राहुल (79 चेंडूंत 55) आणि डावाच्या अखेरीस 38 चेंडूंत नाबाद 40 धावांची खेळी करणारा शार्दूल ठाकूर यांनी. पण हिंदुस्थानसाठी 6 बाद 287 ही धावसंख्या पुरेशी नव्हती हे यजमान संघाने पुन्हा सिद्ध केले.



























































