
परळ येथील केईएमच्या शवचिकित्सा विभागात आता मोफत झेरॉक्स मिळणार आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री रुग्णाच्या निधनानंतर नातेवाईकांची मृत्यूदाखल्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. शिवसेनेच्या प्रयत्नाने ही गैरसोय दूर झाली आहे.
केईएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील काही रुग्ण अगदी शेवटच्या क्षणालाही येतात. काही वेळा त्यांना वाचवणे दुर्दैवाने शक्य होत नाही. काही अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांचाही दुर्दैवाने मृत्यू होतो. अशा वेळी शवचिकित्सेनंतर पोलीस ठाणे आणि स्मशानभूमीत मृत्यू दाखल्याची झेरॉक्स द्यावी लागते. मात्र रात्रीच्या वेळी असा प्रसंग निर्माण झाल्यास मृत्यूदाखल्याची झेरॉक्स काढण्यासाठी कोणतेही सेंटर उघडे नसते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होते. नातेवाईकांची ही गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी आमदार अजय चौधरी यांच्या सूचनेनुसार नगरसेवक अनिल कोकीळ आणि सिंधू मसूरकर यांनी पुढाकार घेत केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. त्यावर तातडीने निर्णय घेत शवचिकित्सा कार्यालयात मोफत झेरॉक्स सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना रावत यांनी केल्या. उद्या 15 फेब्रुवारीपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.



























































