मध्य रेल्वे पश्चिम रेल्वेकडून एसी लोकल भाडय़ाने घेणार; पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे फेऱ्या वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण करण्यात आल्यानंतर ठाण्याच्या पुढे लोकलच्या फेऱयांमध्ये वाढ होणार आहे. ही वाढ करताना मध्य रेल्वेने नवीन वातानुकूलित लोकलचा वेळापत्रकात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मध्य रेल्वेकडे अतिरिक्त वातानुकूलित लोकल नसल्याने पश्चिम रेल्वेकडून ती भाडय़ाने घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावर कल्याण ते सीएसएमटीदरम्यान, हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी आणि गोरेगावदरम्यान वातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहे. ठाणे ते पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरील एसी लोकलला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने ही लोकल गोरेगाव हार्बरवर चालविण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका तयार झाल्याने आता तिसऱया आणि 4 थ्या मार्गावरील लांबपल्ल्याच्या गाडय़ांना पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे तिसऱया व चौथ्या जलद मार्गिकेवर लोकलच्या 80 फेऱयांची वाढ होणार आहे.

आणखी दोन एसी लोकल येणे बाकी…

पहिल्या टप्प्यातील वातानुकूलित लोकलपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी सहा एसी लोकल अशा एकूण 12 एसी लोकल मुंबईकरांना मिळणार आहेत. सध्या मध्य रेल्वेकडे चार एसी लोकल असून आणखी दोन एसी लोकल येणे बाकी आहे. त्यामुळे सध्या आम्ही पश्चिम रेल्वेकडून एक एसी लोकल भाडय़ाने घेत आहोत, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले.