
पैशांसाठी एका महिलेने ती राहत असलेल्या इमारतीमधील पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. गंभीर म्हणजे या कृत्यासाठी तिने आपल्या दहा वर्षांच्या मुलीची मदत घेतली. मुलाला घेऊन जाण्यात ती यशस्वी झाली. पण पोलिसांना हा प्रकार कळताच पाच तासांच्या आत मुलगा पुन्हा त्याच्या आईवडिलांच्या कुशीत आला.
मानखुर्द परिसरातील हिरानंदानीच्या समोरील इमारत क्रमांक 23 मध्ये आरोपी महिला किरण (नाव बदललेले) ही कुटुंबीयासमवेत राहते. त्याच इमारतीत राहणारा पाच वर्षांचा मुलगा बुधवारी दुपारी अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या पालकांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ गावडे, एपीआय विनोद माळवे, उपनिरीक्षक मालवेकर, संदीप रहाणे व पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक मुलगी इमारतीमधून त्या मुलाला घेऊन जाताना दिसली. त्यामुळे पुढील फुटेज तपासले असता गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात एक महिला त्या दोन्ही मुलांसह लगबगीने जाताना दिसून आली. त्यामुळे विविध पथके तयार करून मुलाचा शोध सुरू केला. तेव्हा ती महिला व मुलगी मानखुर्द परिसरात असल्याची माहिती मिळताच कोळी व त्यांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता पैशांकरिता मुलाचे अपहरण केल्याचे व मुलाला बोईसर येथे सोडल्याचे तिने सांगितले. मग मानखुर्द पोलिसांनी बोईसर पोलिसांशी संपर्क साधून मुलाला आपल्या ताब्यात घेतले.
करायचे होते एक, झाले भलते!
मुलाचे अपहरण करून तिला त्याच्या वडिलांकडे पैशांची मागणी करायची होती. त्यानुसार कट रचून तिने मुलाचे अपहरण केले. पण ऐनवेळेला काय करायचे ते तिला सुचले नाही आणि घाबरून मुलाला पालघरला सोडून ती आली, असे पोलिसांनी सांगितले. तिला अपहरणाच्या गुह्यात अटक करण्यात आली.


























































