पुण्यातील नवीन पोलीस ठाण्यांना लवकरच मुर्हूत, नियोजनासाठी बैठक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या  दृष्टीकोनातून  पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत मंजूर करण्यात आलेल्या नवीन सहा पोलीस ठाण्यांना लवकरच मुर्हूत मिळणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यांना जागा, आवश्यक मनुष्यबळ, आर्थिंक तरतूद, वाहने यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली मंगळवारी (दि. 31) मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.

पुणे पोलीस आयुक्तालयात नव्याने नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर  पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार  पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक बाबींवर  चर्चा करण्यात आली. विशेषतः सद्यस्थितीतील पोलीस ठाण्यातंर्गत  लोकसंख्येचा वाढता ताण पोलिसांवर तारेवरची कसरत करण्यासारखा आहे. त्यातच अपुरे मनुष्यबळ आणि वाढत्या गुन्ह्यांमुळे नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज लवकरच सुरू करावे लागणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांसाठी जागेची निवड, आवश्यक निधी, मनुष्यबळ, वाहने यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

पोलिसांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ठाण्यांचे कामकाज सुरू करावे लागणार आहे. त्यापार्श्वभूमीवर लवकरात लवकर जागेचा निर्णयासह आर्थिंक नियोजन करण्यास येणार आहे. दरम्यान, लोणीकंद पोलीस ठाण्यातून नवीन वाघोली पोलीस ठाणे,  हवेली पोलीस ठाण्यातून नांदेड सिटी, चतु:शृंगी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातून बाणेर पोलीस ठाणे, हडपसर-कोंढवा आणि वानवडी पोलीस ठाण्यातून काळेपडळ आणि फुरसुंगी पोलीस ठाणे, चंदननगर पोलीस ठाण्यातून खराडी पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे.

राज्य शासनाने  पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत नव्याने  सहा पोलीस ठाण्यांना मंजूरी दिली आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांसाठी जागेची निवड, आर्थिंक नियोजन, मनुष्यबळ, वाहनांबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. त्यामध्ये वेगवेगळ्या  गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला गती मिळणार आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर