सूर्या तळपला, पण टीम इंडिया विजयापासून वंचित; सूर्यकुमार यादवची  55 चेंडूंत 117 धावांची तुफानी खेळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉटिंगहॅमच्या तिसऱया आणि अखेरच्या टी-20 लढतीत आज हिंदुस्थानचा सूर्यकुमार यादव तेजाने तळपला. पण त्याची  तुफानी खेळी  टीम इंडियाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने ही चुरशीची झुंज अखेर 17 धावांनी जिंकत मालिकेतील आपली पिछाडी 2-1 अशी कमी केली. संघाला मालिकेत क्लीन स्वीपच्या नामुष्कीपासून वाचवण्यात यजमान संघ यशस्वी ठरला. सूर्यकुमार यादवला या लढतीत श्रेयस अय्यर (28) वगळता अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही.

   हिंदुस्थानचे रोहित शर्मा (11), रिषभ पंत (1), विराट कोहली (11) हे स्टार फलंदाज पार फ्लॉप ठरले. 31 धावांतच हिंदुस्थानचे 3 फलंदाज तंबूत परतल्यावर मुंबईकर सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटचा दांडपट्टा बाजीप्रभूंच्या थाटात फिरवत इंग्लंडच्या गोलंदाजांना पार भंडावून सोडले. सूर्यकुमारने 55 चेंडूंत 117 धावांची शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता, पण सूर्यकुमारला अन्य हिंदुस्थानी फलंदाजांची साथ न लाभल्याने टीम इंडियाला या लढतीत 17 धावांनी पराभूत व्हावे लागले. टीम इंडियाचा डाव अखेर 20 षटकांत 9 बाद 198 या धावसंख्येवर आटोपला. या लढतीतील ‘मॅन ऑफ दि मॅच’ म्हणून इंग्लंडच्या रईस टॉपलीला तर ‘मालिकावीर’ पुरस्कार हिंदुस्थानच्या भुवनेश्वर कुमारला देण्यात आला.

  तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जोस बटलरचा हा निर्णय सलामीवीर जेसन रॉय (27) आणि बटलर बाद झाल्यावर मैदानात उतरलेल्या डेव्हिड मलान (77) यांनी सार्थ ठरवला. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल करीत इंग्लंडच्या मलान आणि लियाम लिविंगस्टोन जोडीने वेगाने संघाची धावसंख्या वाढवली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 84 धावांची झंझावाती भागीदारी रचत संघाला मोठय़ा धावसंख्येकडे नेले.

संक्षिप्त धावफलक

   इंग्लंड ः 20 षटकांत 7 बाद 215 (जेसन रॉय 27, डेव्हिड मलान 77, लियाम लिविंगस्टोन नाबाद 42, हॅरी ब्रुक 19; रवी बिष्णोई 30 धावांत 2 विकेट, हर्षल पटेल 35 धावांत 2 विकेट) विजयी वि. हिंदुस्थान ः 20 षटकांत 9 बाद 198  (रोहित शर्मा 11, सूर्यकुमार यादव 117, श्रेयस अय्यर 28; डेव्हिड विली 40 धावांत 2 विकेट, रीस टॉपली 22 धावांत 3 विकेट, ख्रिस जॉर्डन 37 धावांत 2 विकेट).