
स्वतःचं मूल असावं या इच्छेपोटी अनेकजण आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करतात. आयव्हीएफ तंत्रज्ञानाकडे ओढा वाढू लागल्याने आता अनेकांसाठी हे कमाईचं कुरण होताना दिसत आहे. अशाच एका उपचारांसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ग्रेटर नोएडा येथे घडली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबाद येथील वसुंधरा परिसरात राहणाऱ्या चंद्रभान रावत यांची पत्नी ललिता रावत हिला आयव्हीएफ उपचार करायचे होते. 19 ऑगस्ट रोजी ती क्रियेशन वर्ल्ड नावाच्या आयव्हीएफ सेंटरला पोहोचली. या नंतर डॉक्टरने तिला गुंगीच्या औषधाचा ओव्हरडोस दिला. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली.
26 ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला. चंद्रभान रावत यांनी सदर डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली. शुक्रवारी या डॉक्टरला अटक करण्यात आली. या डॉक्टरचं नाव प्रियंजन असं आहे. या डॉक्टरची पदवी तपासल्यानंतर ती बोगस असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.



























































