
लग्नाच्या आठ वर्षांनतर एका महिलेला आपला नवरा ही स्त्री असल्याचं समजलं आहे. हे सत्य कळल्यानंतर महिलेने नवऱ्याविरोधात फसवणूक आणि अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप केला आहे.
ही घटना गुजरातच्या बडोद्यात घडली आहे. विराज वर्धन असं या माणसाचं नाव आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी विराजची ओळख विजयता अशी होती. विजयताचं पहिलं लग्न झालं होतं. 2011मध्ये तिचा नवरा एका अपघातात मृत्युमुखी पडला होता आणि तिला 14 वर्षांची मुलगीही आहे. फेब्रुवारी 2014मध्ये तक्रारदार महिला आणि विराज उर्फ विजयता यांचं लग्न झालं.
ते दोघं मधुचंद्रासाठी कश्मीरला गेले. मात्र, लग्न झाल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. कारण, विराज सतत कारणं पुढे करत होता. त्याने तिला लग्नापूर्वी काही वर्षं आधी रशियात त्याचा अपघात झाल्याचं सांगितलं. त्या अपघातामुळे त्याची लैंगिक संबंध ठेवण्याची क्षमता नाहीशी झाल्याचं त्याने सांगितलं. एका शस्त्रक्रियेनंतर तो ठीक होईल, असा दिलासाही त्याने तिला दिला.
जानेवारी 2020मध्ये त्याने तिला सांगितलं की त्याला वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी कोलकात्याला जावं लागणार आहे. कालांतराने ही शस्त्रक्रिया वजन घटवण्यासाठीची नसून ती लिंगबदल शस्त्रक्रिया होती हे महिलेला कळून चुकलं. तिने चौकशी केल्यानंतर त्याने सत्य सांगून टाकलं. या महिलेने त्यानंतर विराज आणि त्याच्या कुटुंबीयांवर फसवणुकीचे आरोप केले आहेत.
विराजने आपल्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार देखील केली आहे. याबाबत कुणालाही सांगितल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशा धमक्याही विराजने तिला दिल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे.



























































