रंगनाट्य – खमंग नाटय़ाचे गोड रंगलेपन…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राज चिंचणकर

या नाटकात केवळ प्रमुख पात्रांनाच समोर आणलेले नाही; तर पडद्यामागच्या कलाकारांनाही थेट प्रयोगात सामील करून घेतले आहे. त्यामुळे नाटक सुरू असतानाच रंगमंचावर बदलणाऱया नेपथ्याचे रसिकही साक्षीदार होतात. या आगळय़ा प्रयोगामुळे नाटकाचा स्तर अनपेक्षितरीत्या उंचावला आहे.

एक विशिष्ट संवाद अधूनमधून घरोघरी ऐकू येतो आणि तो म्हणजे ‘तू म्हणशील तसं!’ अर्थात वैवाहिक जीवनात अचानक निर्माण झालेल्या विसंवादावर उतारा म्हणून हा संवाद नात्यात ‘एन्ट्री’ घेतो. पती आणि पत्नी या दोघांपैकी एकाने पडती बाजू घेत हा संवाद फेकला की, एकंदर चित्र क्षणात पालटते. याच संवादाला शीर्षकात गुंफत ‘तू म्हणशील तसं!’ या नावाने हे नाटक रंगले असून खमंग नाटय़ाचे गोड रंगलेपन या नाटकाने केले आहे.

एकमेकांना समजून घेण्यासाठी पती-पत्नीला लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ महत्त्वाचा असतो. या काळात या नात्याच्या चवीत कधी गोड तर कधी तिखट असा बदल होत राहतो, पण अनपेक्षितपणे निर्माण होणाऱया सगळ्या अडचणी किंवा वादांवर तोडगा काढला की, हा काळही सुसह्य होऊन जातो. या सर्व गोष्टींचे एकजिनसीकरण ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकात केल्याचे दिसते. या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे अभिनेता म्हणून प्रामुख्याने ओळख असलेल्या संकर्षण कऱहाडे याने या नाटकाच्या संहितेसाठी लेखणी हाती धरली आहे, तर अभिनेता म्हणूनच प्रामुख्याने ठसा उमटवलेल्या प्रसाद ओक याने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. साहजिकच, या दोन्ही कलाकारांची लेखन व दिग्दर्शनाच्या पातळीवर जमलेली भट्टी या नाटकात अनुभवता येते.

लेखक संकर्षण कऱहाडेला एकाच कार्यालयात एकत्र काम करणाऱया पती-पत्नीची गोष्ट अशी थीम सुचल्यावर आपसूकच या नाटय़ाचा पाया खुसखुशीत झाला आहे. या रंगतदार पायावर नंतरचे इमले बांधण्यात त्याने अजिबात हात आखडता घेतलेला नाही. त्याबरहुकूम या नाटकातल्या गौरव आणि अदिती या पात्रांच्या आयुष्यात कधी घडतंय तर कधी बिघडतंय, असा थाट स्वीकारत त्याने लेखणी चालवली आहे. विशेष म्हणजे संहितेतले नाटक दोन स्तरांवर घडत जाते. त्यासाठी घर आणि कार्यालय, अशी विभागणी त्याने केली आहे. या दोन्ही ठिकाणी रंगणाऱया या नाटकासाठी लेखकाने लेखणीत खेळकर बाजाची शाई भरली आहे. साहजिकच, नाटकाचा मूड शेवटपर्यंत मस्त टिकून राहिला आहे.

कागदावरच्या या संहितेला दिग्दर्शक प्रसाद ओक याने खास टच देत हे नाटय़ रंगमंचावर उभे केले आहे. आवर्जून उल्लेख करायचा तर त्याने या नाटकात केवळ प्रमुख पात्रांनाच समोर आणलेले नाही; तर पडद्यामागच्या कलाकारांनाही त्याने थेट प्रयोगात सामील करून घेतले आहे. त्यामुळे नाटक सुरू असतानाच रंगमंचावर बदलणाऱया नेपथ्याचे रसिकही साक्षीदार होतात. या आगळ्या प्रयोगामुळे नाटकाचा स्तर अनपेक्षितरीत्या उंचावला आहे. संहितेला प्रमाण मानत प्रसाद ओक याने नाटकातल्या कलाकारांना रंगमंचावर मोकळा अवकाश प्राप्त करून दिला आहे.

संकर्षण कऱहाडे केवळ नाटक लिहूनच थांबलेला नाही; तर त्याने यात गौरव हे प्रमुख पात्रही रंगवले आहे. त्याचा नाटकातला हा गौरव धमाल उडवणारा आहे. रंगमंचावर अक्षरशः बागडताना त्याने लावलेली ऊर्जा थक्क करणारी आहे. संपूर्ण रंगमंच खेळता ठेवण्याचे त्याचे कसब लाजवाब आहे. नाटकातली अदिती रंगवताना भक्ती देसाई हिने विविध मूड अचूक पकडत या पात्रात गहिरे रंग भरले आहेत. रंगमंचावरचा तिचा ग्रेसफुल वावर आणि संवादफेक यातून तिने ही अदिती अधिकच उठावदार केली आहे.

गौरव आणि अदिती या प्रमुख पात्रांसह या नाटकात अजून दोन पात्रे आहेत आणि तीही तितकीच महत्त्वाची आहेत. ‘बब्रुवाहन रुद्रकंठीवार’ असे नाव धारण करणारा अमोल कुलकर्णी आणि अबोली हे पात्र साकारणारी प्रिया करकमकर या दोघांनी त्यांच्या भूमिका तोडीस तोड उभ्या केल्या आहेत. एकीकडे गौरव आणि अदिती यांच्या नात्यात नाटय़ रंगात असताना बब्रुवाहन आणि अबोली हेसुद्धा त्यांना पूरक ठरत राहतात.  कथासूत्राच्या अनुषंगाने अमोल कुलकर्णी याला रसिकांशी थेट संवाद साधण्याची यात संधी मिळाली आहे. सूत्रधार आणि प्रसंगानुरूप विविध पात्रे साकारताना त्याने स्वतःचा आवश्यक तो कायापालट घडवून आणला आहे. प्रिया करकमकर हिने सतत बडबड करणाऱया अबोलीच्या भूमिकेत बजावलेली बोलकी कामगिरी भन्नाट असून तिने तिचे अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले आहे.

नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी नाटकातले घर व कार्यालय आकर्षक पद्धतीने उभारले आहे. अशोक पत्की यांचे नाटकाला लाभलेले गीत व संगीत नाटकाचा भरभरून आस्वाद घेण्यात अधिकच भर टाकते. ‘गौरी थिएटर्स’ व ‘पुणे टॉकीज’ यांची निर्मिती असलेले हे नाटक प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनने रंगभूमीवर सादर केले आहे.

[email protected]