मायरा म्हणतेय, मी जर मोबाईल असते तर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध व्हीडिओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ आता मोबाईल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे. मोबाईल पोल्युशनवर एक अतिशय समर्पक असणारी अशी काळजाचा ठाव घेणारी शॉर्टफिल्म गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या शॉर्टफिल्मचं प्रमुख आकर्षण आहे, तीिची कन्सेप्ट आणि मायरा वायकुळ. मुख्य म्हणजे कौशिक मराठे यांनी अधिकाधिक जनतेपर्यंत ही शॉर्टफिल्म पोहोचावी म्हणून मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये केली आहे.

मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे ‘सतर्क व्हा’ असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात घडणारा एक प्रसंग घेऊन आली आहे. छोट्या अनूच्या (मायरा वायकुळ) पाचव्या वाढदिवसाचं जंगी आयोजन केलं जातं. पण वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असून सुद्धा मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाईलला समोर धरून तो इव्हेंट शूट करतात. मात्र अनूला हे काही नकोय.. तिला मोबाईलच्या माध्यमातून नात्यांशी जोडायचं नाहीय; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफलं जायचंय. तिला मोठ्ठा केक नकोय, मोठाले गिफ्ट नकोयत, तर तिला हवाय ‘वेळ’. या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत. त्या नात्यांमधला जीवंतपणा निर्माण करायचा आहे. तसं ती आग्रहाने सांगत Disconnect to Reconnect…हा महत्त्वाचा मेसेज देते. नात्यांना जोडणाऱ्या या शॉर्टफिल्मची निर्मिती अद्भुत या निर्मिती संस्थेने केले असून दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केलं आहे.