
डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘झेंडूचे झुले’ आणि ‘हसरगुंडी ’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते संजय राऊत आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे.
शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे हा प्रकाशन सोहळा होणार आहे. स्वामीराज प्रकाशन आणि शलाका प्रकाशन यांनी याद्वारे ग्रंथ निर्मितीत पदार्पण केले आहे. स्वामीराज प्रकाशनतर्फे दर महिन्याच्या 27 तारखेला ‘मराठी आठव दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येतो. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन हा या उपक्रमाचा हेतू आहे. हा हेतू अधिक व्यापक व्हावा यासाठीच स्वामीराज प्रकाशनने ग्रंथ निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून ‘झेंडूचे झुले’ हा राजकीय व्यंगावर बोट ठेवणारा विडंबन काव्य संग्रह साहित्य रसिकांसमोर आणला आहे. राजकीय अपस्मार आणि आकडीवर हे हास्य व्यंग कविता औषध आहे. तर ‘हसरगुंडी’ हा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तन विसंगतीवर सणसणीत फटके देणारा हास्य – व्यंग लेखसंग्रह आहे.
या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार अर्थात तंबी दुराई आणि ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर उपस्थित राहणार आहेत. साहित्य रसिकांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि शलाका प्रकाशनचे भाऊ कोरगावकर यांनी केले आहे.































































