
अवैधरित्या गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करणार्या दोघांना कोंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली. एनआयबीएम रस्ता परिसरातील पप्पू पान शॉप येथे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 5 लाख 73 हजारांच्या 15 ते 20 गुटख्यांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाअटक केली असून त्यांनी हा माल विकत घेतलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे.
जीतलाल श्रीरामनंदन यादव (वय – 39, रा. कोंढवा खुर्द), अभिजीत शिवलिंग कटके (वय – 25, रा. येवलेवाडी, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी शहरात गुटखाविक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई हाती घेतली आहे. शहरातील सर्वच ठिकाणी पोलिसांची छापेमारी सुरू आहे. यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना एनआयबीएम रस्त्यावरील पप्पू पान शॉप याठिकाणी एकजण तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती अंमलदार ज्योतीबा पवार, विशाल मेमाने यांना मिळाली. यानूसार पथकाने येथे छापा टाकला असता गुटख्यांचा मोठा साठा आढळून आला. येथून पोलिसांनी यादव आणि कटके यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हा माल साकीम उर्फ गुड्डू खान याच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले. यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली असून गुड्डू खान याचा शोध घेण्यात येत आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, हवालदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, ज्योतीबा पवार, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, सुरज शुल्का, लक्ष्मण होळकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
गुड्डू खानचा शोध सुरू
एनआयबीएम रस्त्यावरील एका पान शॉपमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याने पोलीस अवाक झाले असून आरोपींनी हा गुटखा विकत घेतलेल्या गुड्डू खानचा शोध घेण्यात येत आहे. गुड्डू खान हा मूख्य सुत्रधार असून त्याला अटक केल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.























































