
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात आल्याने भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु या पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार परत देण्यात आल्याशिवाय पुन्हा अध्यक्षपद स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका देशमुख यांनी घेतली आहे. या पुस्तकातून शहरी नक्षलवादाला कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन दिले गेलेले नाही याचे पुरावे आणि दाखलेही देशमुख यांनी सरकारला दिले आहेत.
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला गेल्या डिसेंबर महिन्यात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु त्यात शहरी नक्षलवादाचे उदात्तीकरण करण्यात आल्याचे सांगत सरकारने तो रद्द केला. इतकेच नव्हे तर या पुरस्कारासाठी स्थापन करण्यात आलेली परीक्षण समितीही रद्द करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाचा साहित्यिक वर्तुळातून निषेध झाला होता. लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना निषेधाचे खरमरीत पत्र लिहून भाषा सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर डॉ. प्रज्ञा दया पवार आणि नीरजा यांनीही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा राजीनामा दिला होता. लेखक शरद बाविस्कर आणि आनंद करंदीकर यांनी पुरस्कार वापसीची घोषणा केली होती.
मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पुणे येथे नुकतीच लक्ष्मीकांत देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तुमचा राजीनामा अद्याप स्वीकारला गेलेला नसून तुम्ही भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा हाती घ्यावा, अशी विनंती केसरकर यांनी त्यांना केल्याचे समजते. त्यानंतर गेल्याच महिन्यात देशमुख यांनी केसरकर यांना एक पत्र पाठवले. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकात कोणत्याही प्रकारे नक्षलवादाचे उदात्तीकरण झालेले नाही, असे त्यांनी पुस्तकातील उताऱयांचे दाखले देत त्यात नमूद केले आहे. तसेच पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार परत दिला जात नाही तोपर्यंत सल्लागार समितीचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
- ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकात नक्षल चळवळीला प्रोत्साहन नव्हे, तर त्या चळवळीवर कठोर टीका करण्यात आली आहे. ती चळवळ लुटारू आणि माफिया झाली आहे असे त्यात म्हटले आहे. ही चळवळ कुठेतरी चुकलेली आहे असे आत्मचिंतन त्या पुस्तकात मांडलेले आहे. आपल्याला गौतम बुद्ध आणि फुले-आंबेडकर यांच्या मार्गाने गेले पाहिजे असेही लेखकाने म्हटले आहे, असे देशमुख यांनी या पत्रात नमूद केल्याचे समजते. मराठी भाषेसाठी काम करणे आपल्याला आवडेल; परंतु पुरस्कार परतीचा निर्णय झाल्याशिवाय माझे परतणेही शक्य नाही असा आग्रह त्यांनी धरला असल्याचे मराठी भाषा विभागातील विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
























































