
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली-विरारदरम्यान लोकल गाडय़ांचा वेग आता वाढणार आहे. लोकलच्या मार्गात वर्षानुवर्षे अडथळे बनून राहिलेली बोरिवली (उत्तर) येथील ट्रक आणि पॉइंट्सशी संबंधित असलेली सर्व ऑपरेशनल कामे रेल्वेने आज पूर्ण केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत बोरिवलीच्या पुढे अर्धा किलोमीटरपर्यंत गोगलगायच्या वेगाने चालणारी लोकल आता ताशी 30 किलोमीटर वेगाने धावणार आहे.
बोरिवली स्थानकाच्या पुढे उत्तरेला रेल्वे रूळ आणि पॉइंट्मध्ये सुधारणांचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले होते. ते आज यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे बोरिवली आणि विरार दरम्यानच्या गाडय़ा निर्धारित वेळेत धावणार आहेत. रेल्वे सदरचे काम करत असताना बोरिवली उत्तर येथील पॉइंट क्रमांक 173 आणि 174 ला थिक वेब स्विचेस (टीडब्ल्यूएस) मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. तसेच 173 क्रमांकाचा पॉइंट 2.8 मीटरने हलविण्यात आला आहे. त्यामुळे लोकल गाडय़ा क्रॉसओव्हर करताना ताशी 30 किमी वेगाने जाऊ शकतात.
लोकल गाडय़ा आता बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून डाऊन जलद मार्गावरून विरारच्या दिशेने वळवल्या जाऊ शकतात आणि बोरिवली स्थानकावरील अप जलद मार्गावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरदेखील येऊ शकतात. त्यामुळे बोरिवली आणि दहिसर स्थानकांदरम्यानचा लोकल गाडय़ांचा मार्ग मोकळा झाला असून त्या वेगाने चालवणे शक्य होणार आहे.


























































