Wrestler protest मी निर्दोष, राजीनामा देणार नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर बृजभूषण यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. या प्रकरणी शुक्रवारी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतरही कुस्तीपटूंचे आंदोलन सुरुच असून याबाबत आता बृजभूषण यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

मी निर्दोष असून तपासाला सामोरा जाण्यास तयार आहे. मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करेन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, असे बृजभूषण शरण सिंह म्हणाले. यादरम्यान त्यांनी राजीनामा देण्याच्या कुस्तीपटूंच्या मागणीवरही त्यांनी भाष्य केले.

हे देखील वाचा – प्रियंका गांधी खेळाडूंच्या भेटीला, बृजभूषण यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर कुस्तीपटू ठाम

राजीनामा देणे मोठी गोष्ट नाही, पण मी गुन्हेगार नाही. राजीनामा दिला तर मी त्यांचे आरोप मान्य केलेत असा अर्थ होईल. आता माझा कार्यकाळ संपत आला असून 45 दिवसांमध्ये निवडणुका होतील. सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे, असे ते म्हणाले.

कुस्तीपटूंनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण एफआयआरची प्रत सध्या माझ्याकडे नाही. एफआयआर दाखल झालाच असेल तर मला त्यात काही गैर दिसत नाही. माझा दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे, असेही बृजभूषण म्हणाले. तसेच विनेश फोगाटमुळे नाही तर माझ्या मतदारसंघातील लोकांमुळे मी खासदार आहे. हरयाणातील 90 टक्के खेळाडू माझ्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला.

कुस्तीपटूंनी 12 वर्ष कोणत्याही पोलीस स्थानकात, क्रीडा मंत्रालयाकडे किंवा महासंघाकडे तक्रार केली नाही. आंदोलनापूर्वी ते माझी स्तुती करायचे, त्यांच्या लग्नाला बोलवायचे, माझ्यासोबत फोटो काढायचे, माझे आशीर्वाद घ्यायचे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. तसेच कुस्तीपटूंच्या या आंदोलनामागे काही उद्योजक आणि काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही बृजभूषण यांनी केला.