संघ मुख्यालयात गेल्यावर वानखेडेंची चौकशी सुरु झाली हे संशयास्पद; नाना पटोले यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, समीर वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होण्याची कारणे काय? ‘दाल में कुछ काला है’ असे दिसत आहे. या प्रकरणात काही ना काही लपलेले आहे, काहीतरी संशयास्पद आहे किंवा समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाची पोलखोल ते करू शकतात, असा दावा पटोले यांनी केला.

भाजपला एवढा त्रास का?

समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू होताच महाराष्ट्रातील भाजप नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर काही मंत्री वानखेडेंच्या केसाला धक्का लावला तर पाहून घेऊ, असे म्हणत आहेत. सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा तर भाजपा सरकारच्याच अखत्यारित आहेत, मग वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीचा भाजपला एवढा त्रास का होत आहे? सरकारी अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणे यात काही ना काही लपलेले आहे, हा काही आरोप नाही तर असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

जागावाटप मेरीटवरच

महाविकास आघाडीतील जागा वाटपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक पक्षाने चाचपणी केली पाहिजे. यात काही गैर नाही, पण जागा वाटपाचा निर्णय हा मेरीटवरच होईल. काँग्रेस पक्षाने काही कमिटय़ा नेमलेल्या आहेत. सर्व बाजूंचा विचार करून जागा वाटप होईल. मेरीटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल. महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून महापुरुषांचा अपमान व संविधानाचा अपमान करणाऱया भाजपला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरू आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.