
सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे तीस्ता नदीने रौद्ररूप धारण केले. पाण्याच्या प्रवाहामुळे तेथील रस्ते देखील वाहून गेले आहेत. नदीला आलेल्या पूरामध्ये लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या तेवीस बेपत्ता जवांनाना शोधण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू करण्यात आले असल्याची माहिती लष्कराने दिली आहे.
ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर, 23 लष्करी जवान बेपत्ता
उत्तर सिक्कीममध्ये अचानक ढग फुटी झाल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला पूर आला आहे. या पूरामध्ये 23 लष्करी जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. #SaamanaOnline #Sikkim #TeestaRiver #CloudBurst pic.twitter.com/IR5DFCxaNK
— Saamana (@SaamanaOnline) October 4, 2023
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लाचेन खोऱ्यात तैनात असलेल्या लष्करी आस्थापनांना याचा फटका बसला आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीच्या पातळीत अचानक 15-20 फूटांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे सिंगतामजवळील बरडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांना फटका बसला. यामध्ये 23 जवान बेपत्ता झाले असून काही वाहने वाहून गेली असल्याची शक्यता आहे.
सिक्कीममध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सिक्कीम मधील रहिवाशांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पूरामध्ये अद्याप कोणही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु येथील सार्वजनिक मालमत्तेचे लक्षणीय नुकसान झाले आहे.





























































