Maratha Reservation Row – जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, 24 तासांत निर्णय घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला एकही निर्णय मला मान्य नाही. काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या, असे ठणकावून सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला. आंदोलकांवर हत्येचा प्रयत्न म्हणजेच कलम 307 अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने जरांगे भडकले आहेत. आमच्या पैशांवर बासुंदी, गुलाबजामून खाता आणि आमच्यावरच दमदाटी करता. एकाही मराठा आंदोलकावर गुन्हा दाखल तर करून बघा! गुन्हे दाखल केल्यास मी रस्त्यावर उतरेन असा इशाराच त्यांनी दिला. दरम्यान, मराठा आंदोलनाच्या वणव्यात महाराष्ट्र धुमसतो आहे. नांदेड-हैदराबाद मार्गावर रास्ता रोकोवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने जमावाने दगडफेक केली. त्यात पोलीस अधीक्षक जखमी झाले. धाराशीव जिह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून जालन्यात इंटरनेट बंद आहे. बीडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राज्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला, तर सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाला जमावाने टाळे ठोकले.

– बीडमध्ये दोन आमदारांची घरे जाळल्यानंतर मंत्री, आमदार तसेच खासदारांच्या घरांवर पोलीस खडा पहारा देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

– मराठा आरक्षणासाठी आज आणखी पाच आत्महत्या झाल्या. गंगाखेडमध्ये अशोक रंगनाथ जाधव, जालन्यात सोपान बाबुराव कचरे तर छत्रपती संभाजीनगर शहरात शुभम अशोक गाडेकर या तरुणाने मृत्यूला कवटाळले. संगमनेरमध्ये सागर भाऊसाहेब वाळे आणि पंढरपुरात विलास किसन क्षीरसागर या तरुणांनी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. आतापर्यंत 20 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत.

सर्वपक्षीय बैठकीतून शिवसेनेला वगळले

मराठा आरक्षणाबाबत सरकारने उद्या सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याला बैठकीचे आमंत्रण नसल्याने संताप व्यक्त होत आहे.