
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मीरा भाईंदर येथे उत्तर भारतीय आणि यादव समाजातर्फे आयोजित गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमात व मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उत्तर भारतीय समाजाला संबोधित करताना भाजपवर निशाणा साधला. गुजरातला मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राला का ओरबडता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातून केला आहे.
”हे राजकारण आहे, कालपर्यंत आपल्या घरात राहिला, आपण ज्यांना सांभाळलं, ज्यांना मोठं केलं तेच आता शत्रू बनून समोर उभे राहिले. सध्याचा हा प्रकार आपल्याला महाभारताची आठवण करून देत आहे. महाभारताच्या युद्धात आपलेच लोक आपल्या समोर असल्याचे पाहून अर्जुन घाबरला. अर्जून म्हणाला हे माझेच लोक आहेत मी कसा धनुष्यबाण उचलू. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीतेचा पाठ शिकवला आणि सांगितले की धर्माविरोधाच जो हत्यार उचलेल त्याच्या विरोधात तुला लढावं लागेलच आज भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने जनता माझ्यासोबत आहे. हिंदुस्थानची जनताच माझ्यासाठी श्रीकृष्ण आहे.
यावेळी ते म्हणाले की, उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये खूप एकता आहे. इथे हिंदी भाषिक लोक दुधात साखरेसारखे मिसळले आहेत. आता तुम्हाला जाणून घ्यायचं आहे दूधात मिठाचा खडा कोण टाकतंय. आपल्या एकतेत मतभेद कोण निर्माण करत आहे? आता राम मंदिर बांधले जात आहे याचा मला आनंद आहे. मला ते दिवसही आठवतात. 1993 साली शिवसेनेने मुंबईत राहणाऱ्या हिंदूंना वाचवलं. तो काळ असा होता की लोकं मी हिंदू आहे हे बोलायला घाबरत होते. जेव्हा इथे मुंबई जळत होती तेव्हा एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांनी अधर्म करणाऱ्यांविरुद्ध धर्माचे रक्षक म्हणून उतरले होते. माझे वडील म्हणायचे की हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. माझे वडील म्हणायचे या देशाला आपला माणणारा प्रत्येकजण आपला आहे. देशासाठी जीव द्यायाला तयार होणारा आपला आहे.
लोकं बोलतात कोरोनाच्या काळात आम्ही खूप चांगले काम केले, पण मी तुम्हाला सांगतो, मी काहीही केले नाही. श्री कृष्ण, श्री राम आणि तुळजा भवानी मातेच्या आशीर्वादाने मी माझे कर्तव्य पार पाडले आहे., असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”निवडणुका आल्या की तुमच्या उत्तर प्रदेशमधील गावातील लोकांना इथे आणलं जातं, तुमच्या गावातील लोक प्रमुख म्हणून येतात हे बघून तुम्हाला चांगले वाटते. पण जोपर्यंत मतदान व्हायचे आहे तोपर्यंत ते तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतात आणि मतदान संपल्यावर ते अचानक गायब होतात. पण तुम्हाला आणि मला एकत्र राहायचे आहे, म्हणून माझा सल्ला आहे दूधात मिठाचा खडा टाकणाऱ्यांना लांब ठेवा. त्यांना सांगा की आम्ही येथे आनंदी आहोत, आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. जेव्हा इथे काही आपत्ती, समस्या आली तर पहिला शिवसेनेचे लोक किंवा शिवसैनिक येतात. अनेकवेळा असे घडते की, लोकांचे प्राण वाचवताना आमच्या सैनिकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करणाऱ्यांना दूर ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले
























































